बोईसर : आर्थिक फसवणुकीसाठी चोरट्यांकडून नवनवीन कल्पनांचा वापर केला जात आहे. बोईसर मध्ये अशाच एका घटनेत वॉकीटॉकीचा वापर करून महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.टी.एम. कार्ड व पासवर्ड मिळवून रक्कम लांबवणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी समीरा मुशर्रफ खान (वय ३७ वर्षे, रा. पालघर) या सालवड शिवाजी नगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम. केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला सात हजार रुपयांची रोख रक्कम एटीएम मधून काढली. त्यानंतर पैसे काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न केला असता त्याचे ए.टी.एम. कार्ड मशीनमध्ये अडकल्यानंतर रूममध्ये लपवून ठेवलेल्या वॉकीटॉकीमधून आरोपीने कॅमेऱ्यातून पाहत असल्याचे भासवून मदत करण्याचे नाटक केले. तीन वेळा पिन नंबर टाकून कॅन्सल आणि एंटर बटन दाबण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईल नंबर लिहून ठेवण्यास सांगून एटीएम मशीन दुरुस्त करणारा माणूस आल्यानंतर फोन करून कार्ड परत दिले जाईल असे सांगून फिर्यादीला घरी पाठवले. त्यानंतरआरोपीने ए.टी.एम. मधून कार्ड काढून फिर्यादीच्या खात्यातून ९० हजार रुपये काढून फसवणूक केली.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. ३९५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनील जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जितेंद्र रामदेव पाल याला कळवा, ठाणे येथून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून फसवणूक केलेली ६० हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले २ वॉकीटॉकी संच आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.