बोईसर : बोईसरच्या आठवडा बाजारात गर्दीचा गैरफायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक करून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला. बोईसर च्या नवापूर नाका परिसरात राहणाऱ्या गीता गणपत ठाकूर, वय ७० वर्षे ही वृद्ध महिला २१ ऑगस्ट रोजी आठवडा बाजारात भाजी खरेदी करून घरी परतत असताना गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरी केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. बोईसरमधील वर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीचा घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले.

अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने,पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठे, पोलीस कर्मचारी विजय दुबळा, नीरज शुक्ला, सुनील मलावकर, योगेश गावित, मयूर पाटील, देवेंद्र पाटील, धीरज साळुंखे, मच्छिंद्र घुगे, गणेश वस्कोटी, सचिन सोनवणे, शुभम सपकाळे, किरण वाघ, रोहित पाटील, दीपक दीपक पालवे यांच्या पथकाने भाजी बाजारामध्ये भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संजय नगर परिसरातील रजाबाई मोहन हतागळे आणि रेणुका संजय हतागळे या दोन संशयित महिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केल्यावर त्यानी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही महिलांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमत आणि २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ जप्त केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे हे करीत आहेत.