पालघर : राज्यभरातील युवा खेळाडूंचे बोईसरच्या तारापूर अणुऊर्जा कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या (टॅप्स कॉलनी) मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेत ‘वेगवान धावपटू’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कारांचे आकर्षण ठरणार आहे. पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी असून राज्यभरातील युवा खेळाडूंच्या कौशल्याचा, वेगाचा आणि सामर्थ्याचा रोमांचक आविष्कार आता बोईसरच्या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे.
राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पालघर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा ३ ते ५ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत बोईसर येथील टॅक्स ३ व ४ परिसरातील कॉर्लिनी मैदानावर पार पडणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून निवड झालेले प्रतिभावान शालेय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून धावणे आणि विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. त्यामुळे बोईसरचे मैदान तीन दिवस क्रीडाप्रेमींच्या उत्साहाने गजबजणार आहे.
‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कार ठरणार आकर्षण!
या राज्यस्तरीय स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आलेले ‘वेगवान धावपटू’ (Fastest Runner) आणि ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ (Best Athlete) पुरस्कार. मैदानावर सर्वाधिक वेगाने धावणाऱ्या खेळाडूंना वेगवान धावपटू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या पुरस्कारांसाठी मुला-मुलींचे स्वतंत्र गट ठेवण्यात आले असून वेगवान धावपटूंना आकर्षक ट्रॅक सूट तर सर्वोत्कृष्ट खेळाडूंना सायकल देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीतून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी विशेष चुरस पाहायला मिळणार आहे.
युवा खेळाडूंसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ
शालेय जीवनातच खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून त्यांना राज्यस्तरावर संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळणार आहे.
विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद पालघर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. या आयोजनामुळे पालघर जिल्ह्याची राज्याच्या क्रीडा नकाशावर वेगळी ओळख निर्माण होण्यासही मदत होणार आहे.
पालघरकरांनो, युवा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर या!
राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचा साक्षीदार होण्याची संधी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे पालघर आणि बोईसर परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच क्रीडा संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वेग, जिद्द, संघर्ष आणि विजयाचा जल्लोष अनुभवण्यासाठी बोईसर सज्ज झाले आहे! ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान टॅप्स कॉलनी मैदानावर रंगणाऱ्या या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धांचे आयोजन पालघर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद पालघर डॉ. इंदू राणी जाखड, नवनाथ फरताडे उपसंचालक मुंबई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत आहेत. या स्पर्धेस महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना , पालघर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना तसेच पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ , पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटना यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. खेळाडूंची भोजन आणि निवास व्यवस्था डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालय बोईसर या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
