पालघर: बोईसर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर ग्रामीण भागात परतणाऱ्या वऱ्हाडींचा धोकादायक प्रवास रोखण्यासाठी पालघर जिल्हा वाहतूक पोलिसांनी एक कौतुकास्पद आणि संवेदनशील पाऊल उचलले. धानिवरी येथील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे अलर्ट मोडवर असलेल्या वाहतूक शाखेने, मालवाहू वाहनांमधून (टेंपो, ट्रक) जीवघेणा प्रवास करणाऱ्या नागरिकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे प्रबोधन केले. इतकेच नव्हे, तर या हजारो वऱ्हाडींना सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांनी तातडीने एसटी बसेसची चोख व्यवस्था करून दिली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला असून, त्यांच्या या मानवी दृष्टिकोनाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २०१ वधू-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा २३ मे बोईसर येथे संपन्न झाला. या प्रसंगी नववधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी शासन व प्रशासनातील अनेक मान्यवर आणि निमंत्रित पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य सोहळ्याला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह हजारो वऱ्हाडी मंडळी आली होती.

सामुदायिक विवाह सोहळा संपल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक नागरिक मालवाहतूक वाहनांमधून (टेंपो, ट्रक इ.) अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करून घरी परतण्याच्या तयारीत होते. मात्र, बोईसर-पालघर येथील या मार्गावर जिल्हा वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई करून सोडून देणे टाळले. त्यांनी नागरिकांना थांबवून सुरक्षित प्रवासाबाबत त्यांचे प्रबोधन केले. मानवी जीविताचे महत्त्व पटवून देत, मालवाहू वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करणे किती घातक ठरू शकते, हे वऱ्हाडींना अत्यंत संवेदनशीलतेने समजवून सांगितले.

वाहतूक विभागाकडून बसेसचे नियोजन

केवळ प्रबोधन करून पोलीस थांबले नाहीत, तर लग्नसोहळ्याला आलेल्या या नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने तातडीने एसटी बसेसचे नियोजन करून दिले. मालवाहतूक वाहनांऐवजी प्रवाशांना सुरक्षित बसेसमध्ये बसवून रवाना करण्यात आले.
..
धानिवरी येथील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभाग कायम सतर्क हा. घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता प्रयत्न सुरू आहेत.

  • अनिल व्हटकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग