बोईसर : बोईसर मध्ये एकाच मांडवात २२० गरीब आदिवासी वधू-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला. शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे खास उपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव माध्यमातूनद्वारे विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.

बोईसर मधील सर्कस मैदानात शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांच्यामार्फत आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजामधील २२० वधू वर जोडपी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये विवाहबद्ध झाले. यावेळी आठ दिव्यांग वधू-वरांनी देखील लग्न गाठ बांधली .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धानिवरी येथील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली. गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांना सध्या लग्नाचा खर्च परवडत नसल्याने अशा पद्धतीने सामूहिक विवाह सोहळे हे महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी योगेश कदम यांनी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्यात आगामी काळात तालुका निहाय दौरा करून आदिवासी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कदम म्हणाले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैद्यकीय कारणांमुळे विवाह सोहळ्याला येऊ शकले नाहीत मात्र त्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधत विवाह सोहळ्यात सहभागी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनेत्या ज्योती मेहेर, वैदेही वाढाण, विक्रम प्रताप सिंह इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेना उपनेते जगदीश धोडी, सह संपर्कप्रमुख वैभव संखे, हरिंदर सिंह, सागर धोडी, कल्पेश धोडी यांनी विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.

गोहत्येच्या गुन्ह्यात कठोर कारवाई :

गोहत्या संदर्भात कालच बैठक झाली असून एखादा आरोपी गो तस्करीत वारंवार सापडत असेल तर त्याच्यावर मकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याच परिपत्रक काढले आहे . यासंदर्भात अनेक संघटनांनी आमच्याकडे पत्र व्यवहार केला असून या प्रकरणांमध्ये काही अधिकारी दोष आढळले तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला