बोईसर : बोईसर पोलिसांना घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोईसर जवळच्या बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग न्यू हेवन परिसरात राहणाऱ्या राजेंद्र इंद्रबहादुर यादव यांच्या मालकीचे प्रिन्स बार अँड रेस्टॉरंट आहे. नऊ जुलै रोजी अज्ञात चोरट्याने बारच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत मधील २० हजार रुपये रोख आणि तीन हजार ४१५ रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादीने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पालघर पोलीस अधीक्षक यतीस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरा चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे पालघर येथील रोहित विश्वकर्मा आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक,वय १७ वर्षे यांना चौकशीसाठी संशयित म्हणून ताब्यात घेतले.
रोहित विश्वकर्मा यास अटक करून तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.त्याचप्रमाणे आरोपीने बोईसर आणि केळवे पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी देखील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून बोईसर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोन्ही गुन्ह्यातील ३५ हजार ९४५ रुपये मुद्देमाल आणि चोरीच्या घटनेत वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्माराम बोरसे हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठे, पोलीस कर्मचारी आत्माराम बोरसे, विजय दुबळा, जयराम चौधरी, योगेश गावित, गणेश वस्कोटी, मयूर पाटील, देवेंद्र पाटील, धीरज साळुंखे, मच्छिंद्र घुगे, शुभम सपकाळे, सचिन सोनवणे, किरण वाघ आणि रोहित पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करण्याची कामगिरी पार पाडली.
