डहाणू : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या देशातील पहिल्या अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाने पालघर जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात एक मोठी कामगिरी बजावली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात ४५४ मीटर लांबीच्या दुसऱ्या डोंगर बोगद्याचे (माउंटन टनेल-६) काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून यामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या २५ दिवसांपूर्वीच पालघर मधील सफाळे येथे पहिल्या साधारण १.५ किलोमीटर बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले होते. त्यानंतर आता महिनाभरातच दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करून रेल्वेने विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.
डहाणू तालुक्यातील जामशेत जळवील हा बोगदा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जात होता. पालघरमधील गुंतागुंतीची भौगोलिक रचना आणि असमान जमीन यामुळे येथे मोठी ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरणे अशक्य होते. अशा परिस्थितीत, ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत’ (एनएटीएम) या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. १४.४ मीटर रुंदीच्या या बोगद्यातून बुलेट ट्रेनचे दोन्ही (येणारे आणि जाणारे) मार्ग धावणार आहेत. प्रत्यक्ष वेळेत जमिनीची स्थिती पाहून रॉक बोल्ट्स आणि शॉटक्रिटिंगच्या साहाय्याने केवळ एका वर्षाच्या कालावधीत हे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
डहाणू येथील बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार हेमंत सवरा यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवून बोगद्याचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी बोगद्याचे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. कामगारांनी भारत माता की जय म्हणत उत्साह साजरा केला. पालघर जिल्ह्यातील एकूण सात डोंगर बोगद्यांपैकी दोन बोगदे आता पूर्ण झाले असून उर्वरित पाच बोगद्यांवर काम सुरू आहे. या प्रगतीमुळे आगामी काळात पालघर हे देशातील महत्त्वाचे ‘ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.
प्रकल्पाची सद्यस्थिती
मुंबई-अहमदाबाद उच्च-गती रेल्वे प्रकल्पाची लांबी सुमारे ५०८ किमी आहे, ज्यात गुजरात आणि दादरा व नगर हवेलीमध्ये ३५२ किमी आणि महाराष्ट्रात १५६ किमी आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी, सुमारे ३३४ किमी व्हायाडक्ट्स, १७ नदी पूल, आणि राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे व इतर पायाभूत सुविधांवर १२ प्रमुख ओलांडणी पूल पूर्ण झाले आहेत. प्रकल्पाच्या गुजरात विभागात रूळ टाकण्याचे आणि वीजवाहिन्यांचे काम वेगाने सुरू आहे.
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या भरीव निधीमुळे पालघर जिल्ह्यातून जाणारे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. २०१४ पूर्वी महाराष्ट्राला मिळणारा रेल्वे निधी वार्षिक ११०० कोटींच्या आसपास होता, तो आता २३ हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. याचाच परिणाम म्हणून बुलेट ट्रेनसह विरार-डहाणू तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. शिवाय जिल्ह्यातून विविध महत्त्वाचे प्रकल्प जात असून वाढवण बंदर सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे उभा राहत आहे. त्यामुळे पालघर हा देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे.- हेमंत सवरा, खासदार पालघर लोकसभा

