पालघर : राज्य परिवहन महामंडळाकडे असणाऱ्या मोकळ्या जागा विकसित करून प्रवाशांना अधिक सुख सोयी देण्यासोबत त्या ठिकाणाचा वाणिज्य वापर करण्याबाबत परिवहन विभाग विचाराधीन असून पालघर एसटी आगारात बस पोर्ट अर्थात एसटी बसेस साठी सुरक्षित निवारा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्य परिवहन मंडळाकडे असणारी सुमारे १३६० एकर जागा विकसित करावयाची असली तरीही फक्त शहरी भागातील महामंडळाकडे असणाऱ्या जागा विकसित करून चालणार नाही. त्यामुळे शहरी ठिकाणी असणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या जागेचा विकास करताना त्या सोबतीने एक तालुकास्तरीय व एक ग्रामीण भागातील एसटी कडील जागेचा विकास एकत्रित रित्या करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने ६३ डेपोंचा असाच त्रिकूट पद्धतीने विकास केला जाणार असून यासंबंधीत निविदा पुढील दोन महिन्यात प्रसिद्ध होतील असे परिवहन मंत्री यांनी सांगितले. या निविदा प्रक्रियेत पालघर आगाराचा समावेश केला जाणार असून पुढील वर्षभरात पालघर येथे अद्ययावत एसटी स्थानक उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही योजना सार्वजनिक खाजगी भागीदारीतून राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लोक दरबारामध्ये बोईसर एसटी स्थानकात सुविधांचा वनवा असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालघरच्या विभाग नियंत्रक यांना त्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्याचे देखील मंत्री महोदयांनी सूचित केले. राज्य परिवहन मंडळाशी निगडित अनेक प्रश्न या लोक दरबारात तातडीने सोडविण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाच्या बस गाड्या व आगारांची स्थिती दयनीय असल्याबाबत विचारणा केली असता ही वस्तुस्थिती असल्याचे परिवहन मंत्री यांनी मान्य केले. याच पार्श्वभूमीवर आपण राज्यातील प्रत्येक डेपोला भेट देऊन परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व भागात अशीच परिस्थिती कायम असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल असेही त्यांनी प्रतिपादन केले.
राज्यातील सर्व आगारांना वर्षभरात प्रत्येकी १० नव्या बस गाड्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील पाच वर्षात राज्य परिवहन विभाग प्रतिवर्षी ५००० नवीन बस गाड्यांची खरेदी करणार आहे. यामध्ये १२ मीटर व नऊ लिटर लांबीच्या बस गाड्यांसोबत साडेसात मीटरच्या बसचा समावेश असून त्या सोबतीने राज्यात २००० नवीन छोट्या बस गाड्यांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महिला प्रवाशांना एसटीच्या भाड्यात ५० टक्के सूट देण्याची योजना राबवल्यापासून महिला वर्गाची प्रवासी संख्या काही पटीने वाढली आहे. महिला वर्गाकडून मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे एसटी तोट्यात असल्याचे आपण कधीही म्हटले नव्हते असा खुलासा करत या प्रवर्गासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीचे पैसे शासनाकडून नियमित मिळाल्यास राज्य परिवहन मंडळ नफ्यात राहू शकेल असे आपण नमूद केल्याचा खुलासा प्रताप सरनाईक यांनी केला. लोकांसाठी सेवा देणारे परिवहन मंडळ तोट्यात असले तरीही वित्त विभागांकडून नियमित निधी देण्याचे सहकार्य लाभल्यास आपल्या विभागाची परिस्थिती अधिक सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एसटी तिकडे एसटी
राज्य परिवहन मंडळ एसटीची सेवा डोंगर दर्यामध्ये वसलेल्या आदिवासी पाड्यांपर्यंत अर्थात अनुसूचित जमाती (शेड्युल ट्राईब – एसटी) लोकांना सहजगत उपलब्ध व्हावी तसेच त्या ठिकाणी सुरळीत व सुरक्षित प्रवास व्हावा हे उद्दिष्ट आपल्या विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास दुर्गम भागात कमी लांबीच्या बस गाड्या पाठवण्याविषयीचा अभ्यास केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालघरचे विकसित होणारे बस पोर्ट पूर्वेला की पश्चिमेला?
पालघर येथे बस पोर्ट उभारण्याचा निश्चय परिवहन मंत्री यांनी स्पष्ट केला तरीही विकसित होणारा बस डेपो पूर्वेकडे असणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या ठिकाणी आखण्यात येणार की पश्चिमेला असणाऱ्या पालघर आगाराचे रूपांतर या सुविधा केंद्रात केले जाणार याबाबत एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे.
अनुदान योजनेचे समर्थन
राज्य परिवहन मंडळाचे सदस्य तसेच विविध रिक्षा चालक-मालक संघाच्या सदस्यांच्या, परिवहन महामंडळामधील सदस्यांच्या पाल्यांना रॅपिडो बाईक टॅक्सीसाठी १० हजार रुपये अनुदान देण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे समर्थन करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इतर अनेक राज्यांमध्ये ही योजना यशस्वीरित्या कार्यरत असल्याकडे लक्ष वेधले.