scorecardresearch

सातासमुद्रापार गेलेल्या गोधडी व्यवसायाला हुडहुडी

करोनामुळे अनेक लहानमोठे उद्योग अडचणीत आले आहेत. काही उद्योगांना टाळेही लागले आहेत.

हमरापूरचा गोधडी व्यवसाय थंडीच्या दिवसांत संकटात; उद्योग बंद करण्याची वेळ

रमेश पाटील

वाडा: करोनामुळे अनेक लहानमोठे उद्योग अडचणीत आले आहेत. काही उद्योगांना टाळेही लागले आहेत. वाडा तालुक्यातील मौजे हमरापूर येथील अनेक बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या एके काळी सातासमुद्रापार गेलेल्या गोधडी व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. ऐन थंडीच्या दिवसांत  विक्री थंडावल्यामुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ येथील बचतगटांवर आली आहे. वाडा तालुक्यातील हमरापूर येथील ओमगुरुदेव, भाग्यलक्ष्मी, प्रगती, एकवीरा तसेच साईलीला महिला बचत गटांनी एकत्र येऊन तयार केलेला गोधडी व्यवसाय सातासमुद्रापलीकडे गेला होता. या गोधडीची ऊब अमेरिकेतील शेकडो ग्राहकांनी घेऊन समाधान व्यक्त केले होते. वर्षभरात तीन ते चार लाखांचा गोधडीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या महिला बचत गटांवर गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या सावटामुळे ७० ते ८० टक्के मागणी घटल्याने हा व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे.

दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापूर या खेडेगावात गेल्या तीन वर्षांपासून या बचत गटांतील  महिलांनी एकत्र येऊन एका विशिष्ट प्रकारची गोधडी शिवून तिची विक्री करणे हा व्यवसाय सुरू केला. हमरापूर गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज या ठिकाणी मोठय़ा संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्यापर्यंत ही गोधडी येथील महिलांनी पोहोचविली. थंडीपासून संरक्षण करणाऱ्या अन्य वस्त्रांपेक्षा या गोधडीमधील ऊब खूपच चांगली मिळत असल्याने त्यांनी या बचत गटाकडून शंभरहून अधिक गोधडय़ा विकत घेऊन त्या त्यांनी सातासमुद्रापलीकडील त्यांच्या देशातही त्या वेळी नेल्या. दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे  झालेल्या लक्ष्मी सरसमध्ये या बचतगटाने ३५ हजार रुपयांच्या गोधडय़ांची विक्री केली होती.

दोन वर्षांपूर्वी (८ फेब्रुवारी २०२०) ‘इंग्लंड – अमेरिकेत थंडीत मराठमोळय़ा गोधडीची ऊब’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर या गोधडी प्रकल्पाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या गोधडी प्रकल्पाला भेट देऊन महिलांचे कौतुक केले होते.  या प्रकल्पासाठी शासनाकडून मदतीचा हात दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने या गोधडी प्रकल्पाला आजवर कुठलीच मदत केलेली नाही. शासनाने निश्चित अशी या गोधडी व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर अनेक बचत गटांतील महिलांना कायमचा रोजगार मिळेल, असे हमरापूरच्या ओम गुरुदेव महिला बचतगटाच्या अध्यक्षा प्रतीक्षा प्रमोद पाटील यांनी सांगितले.

गोधडी बनविण्याची पद्धत

चांगल्या दर्जाचा रंगीत कपडा घेऊन सहा फूट लांब आणि सहा फूट रुंद अशी त्याची मोठी पिशवी केली जाते.  या पिशवीमध्ये चांगल्या दर्जाचा रजईचा कापूस दीड ते अडीच किलोपर्यंत  भरून ही गोधडी सुताचा धागा घेऊन हाताने शिवली जाते. वजनाला अत्यंत हलकी असलेली ही गोधडी अत्यंत कमी तापमानामध्ये तर फार उपयुक्त आहेच, पण अधिक तापमानामध्येही या गोधडीचा वापर केल्यास कुठलाही त्रास होत नाही. एका गोधडीसाठी  ६०० ते ७०० रुपये खर्च येतो  व ती एक हजार ते १२००  रुपयांपर्यंत विकली जाते. तसेच ही गोधडी वारंवार धुलाई करता येत असून ती चार ते पाच वर्षे सहज टिकते, असे ओम गुरुदेव बचत गटाच्या सचिव हर्षली हितेश पाटील हिने सांगितले. 

बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे

सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना  तसेच आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थ्यांना पांघरूण म्हणून सरकारने या गोधडय़ा पुरविल्या तर ग्रामीण भागातील शेकडो बचत गटातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Business gone overseas winter crisis ysh

ताज्या बातम्या