पालघर – वातावरण बदल व इतर अनेक कारणांमुळे अवेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक व्यवसायांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होते. कृषी क्षेत्राला विमा संरक्षण कवच उपलब्ध असले तरीही उघड्यावर चालणारे मीठ उत्पादन तसेच वीटभट्टी या व्यवसायांना विमा संरक्षण मिळत नसल्याने या व्यावसायिकांचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मोठे नुकसान होत आहे.

मे महिन्याच्या मध्यापासून पूर्व मान्सून सरी सुरू होण्याचे प्रकार गेल्या १० वर्षांपासून होत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे १७ ते १९ मे २०२१ मध्ये तसेच २ मे २०२३ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील कृषी तसेच इतर संलग्न व्यावसायिकांचे नुकसान झाले. यंदादेखील मेच्या पहिल्या आठवड्यात तसेच मध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक व्यवसायांना आर्थिक नुकसान झाले आहे.

कृषी क्षेत्राला काही प्रमाणात विमा कवच असल्याने शेतकऱ्यांना तुटपुंजी का असेना भरपाई मिळत असते. शेतकरी तसेच बागायतदार यांना नुकसानीच्या प्रमाणात शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई कमी असली तरीही पुढील हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी ते पुरेसे ठरते. मात्र वीटभट्टी व मीठ उत्पादकांसाठी शासनाने आर्थिक नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी कोणतीही व्यवस्था न केल्याने या व्यावसायिकांना वातावरणातील लहरीपणाचा जोरदार फटका बसताना दिसून येत आहे.

आभाळाच्या खुल्या छत्राखाली केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायामध्ये काळी माती आणून त्यामध्ये कोळसा, तूस व इतर वस्तूंचे मिश्रण करून साच्याच्या मदतीने विटा पाडल्या जातात. या विटांची विशिष्ट पद्धतीने रचना करून त्या भट्टीला पेटवून त्यापासून विशिष्ट कालावधीनंतर विटा तयार होताना दिसतात. विटा पाडण्याचे काम हे मोठ्या क्षेत्रफळावर सुरू असल्याने आगाऊ सूचना न मिळता पाऊस आल्यास पाडलेल्या अथवा भट्टीकरिता रचलेल्या विटा झाकून ठेवणे, अर्धवट पक्की असलेली वीटभट्टी अवकाळी पावसादरम्यान झाकून ठेवणे अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे अशा विटांचे पावसामध्ये पूर्णपणे नुकसान होताना दिसते. शिवाय अर्धवट कच्च्या असणाऱ्या विटांची खरेदी केली जात नसल्याने विटा बनवण्यासाठी लागणारा मनुष्यबळाचा खर्च तसेच कच्च्या मालाची नासाडी होते.

पालघर, वाडा, विक्रमगड यांसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एकूण सुमारे ९५० वीटभट्ट्या असून प्रत्येक वीटभट्टीधारकाचे अवकाळी पावसात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक वीट उत्पादकाचे किमान पाच लाख रुपये नुकसान झाले असून त्यांना या व्यवसायात कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नसल्याने भरपाई मिळणे शक्य होत नाही.

वीट उत्पादन व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा देण्यात यावा व त्या अनुषंगाने नंतर विमा कवच मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. तसेच शासनाने हा दर्जा बहाल केल्यास या व्यवसायाला आगामी काळात संरक्षण मिळू शकेल. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसाय व काम करणाऱ्या असंघटित मजुरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणे शक्य होईल.

वीट उत्पादकांप्रमाणेच पालघर जिल्ह्यात ६० ते ७० मीठ उत्पादक संघ असून बहुतांश सहकारी संस्था शासनाच्या ‘लीज’ (भाडेतत्त्वावर घेतलेल्या) जागेवर मीठ उत्पादन करत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाऊस संपल्यानंतर हा व्यवसाय सुरू होतो. मीठ उत्पादनाचे वाफे तयार करणे व समुद्रातील पाणी घेऊन त्यामधील खारटपणाचे प्रमाण टप्प्याटप्प्यामध्ये वाढवण्याची लांबलचक प्रक्रिया केली जाते. अर्थात उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यात मिळणाऱ्या मिठामध्ये मातीचे प्रमाण अधिक असून अशा मिठाला चांगला दर मिळत नाही. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून मे महिन्यादरम्यान पूर्वीच्या तीन-चार महिन्यांत बाधित झालेल्या प्रमाणाइतकेच मीठ उत्पादित होते. मे महिन्यात उत्पादित होणाऱ्या मिठाचा दर्जा तुलनात्मक चांगला असल्याने अशा मिठाला चांगला दर मिळत असतो. या श्रेष्ठ दर्जाच्या मिठावर यांचे अर्थकारण अवलंबून असून एप्रिल-मे महिन्यात पाऊस झाल्यास उत्पादित केलेल्या मिठाचे नुकसान होण्याबरोबर मिठागरामध्ये तयार होऊ पाहणाऱ्या मिठाच्या पाण्याचा खारटपणा कमी झाल्याने मीठ उत्पादनाचे संपूर्ण चक्र विस्कळीत होते.

मीठ उत्पादन हे शेतीशी संलग्न असून आपल्याला कृषी विभागामध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी प्रलंबित असून असे झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे मिठागराला नुकसानभरपाई मिळू शकेल तसेच सवलतीच्या दरामध्ये वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास मिठाचा उत्पादन खर्च कमी होऊ शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकप्रतिनिधींचा पुढाकार महत्त्वाचा

वीट उत्पादक व मीठ उत्पादक क्षेत्रातील व्यवसाय अनुक्रमे लघुउद्योग व कृषी विभागामध्ये समाविष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी सर्व स्तरांतून मागणी होणे आवश्यक आहे. असे झाल्यास या व्यवसायांना अवकाळी पाऊस व वातावरणातील इतर बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळू शकेल.