चढय़ा दराने प्राणवायू खरेदी

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रिवेरा कोविड रुग्णालयात द्रव्यरूपातील प्राणवायू पुरवठा खरेदी चढय़ादऱ्याने झाल्याचे दिसून आले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनाची हतबलता

नीरज राऊत

पालघर : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रिवेरा कोविड रुग्णालयात द्रव्यरूपातील प्राणवायू पुरवठा खरेदी चढय़ादऱ्याने झाल्याचे दिसून आले आहे. विक्रमगड येथील या रुग्णालयात शासनाने मंजूर केलेल्या दरापेक्षा साडेसहापट अधिक दराने प्राणवायूची खरेदी केली आहे. त्यानुसार किमान २० लाख रुपये अधिक खर्च झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाच्या २५ सप्टेंबर २०२० च्या आदेशानुसार द्रव्य रूपातील प्राणवायूकरिता पंधरा रुपये २२ पैसे प्रति घनमीटर इतके दर निश्चित करण्यात आले होते. त्याशिवाय वाहतूक व इतर खर्च अतिरिक्त आकारणी करण्याची मुभा देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या पुरवठादारांकडून प्राणवायू पुरवठा करण्यात येत असे व प्रत्येक रिफिलिंगची आकारणी वेगवेगळी होत असे. 

पहिल्या लाटेत नासिक ऑक्सिजन कंपनीकडून  प्रतिघनमीटर २५ रुपये इतकी प्राणवायूची आकारणी होत असे. परंतु  दुसऱ्या लाटेत जिल्हाबंदी झाल्यामुळे नाशिक ऑक्सिजन येथून जिल्ह्यात येणारा प्राणवायू पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे बोईसर येथील इंडो ऑक्सिजन कंपनीमार्फत त्याच दराने पुरवठा केला जाऊ लागला. असे असताना वाडा नेहरोली येथील हॅरिसन स्टील कंपनीकडून  ३५ रुपये प्रतिघनमीटर इतक्या दराने प्राणवायूची आवक होत होती. पहिल्या लाटेदरम्यान कुडूस (वाडा) येथील एस.आर इंटरप्राईजेस या कंपनीने ४३-४४ रुपये प्रतिघनमीटर इतक्या दराने प्राणवायू पुरवठा केला असताना २१ एप्रिल ते २१ मे  दरम्यान  तब्बल १६८ रुपये प्रतिघनमीटर इतक्या वाढीव दराने प्राणवायू पुरवठा केल्याचे निदर्शनास आले आहे.

या महिन्याभराच्या कालावधीत २१ हजार शंभर घनमीटर प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला. त्यापोटी सुमारे ३६ लाख रुपयांची देयके जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली होती. प्राणवायूचा हा पुरवठा जर बाजारभावाप्रमाणे तसेच इतर पुरवठा धारकांच्या प्रचलित दराप्रमाणे आकारला असता तर त्यावर पाच ते सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे सुमारे पाच ते सहा पटीने ज्यादा दर आकारणी करून परिस्थितीचा लाभ घेऊन संबंधित ठेकेदाराने जिल्हा प्रशासनाला वेठीस धरून फसवणूक केल्याचे आरोप भाजपचे विक्रमगड शहर अध्यक्ष परेश रोडगे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी कार्यालय, रिवेरा रुग्णालय व्यवस्थापन तसेच विविध पातळीवर तक्रारी केल्या आहेत. तरीही त्यासंदर्भात संबंधित पुरवठाधारकांविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी सल्लामसलत करून ३६ लाखांच्या देयके आकारणीमध्ये सुमारे पाच ते सात लाख रुपये कमी केल्याचे सांगण्यात आले. प्राणवायू उपलब्ध करून द्यायचे व त्याची दर निश्चित करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे आहेत.  जिल्हा प्रशासनासमोर मर्यादा आहेत, असे सांगण्यात आले. दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची झपाटय़ाने वाढलेली संख्या व रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूच्या आवश्यकतेमुळे ही खरेदी केली गेल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तुटवडय़ामुळे मिळेल त्या किमतीत खरेदी

दुसऱ्या करोना लाटेदरम्यान पालघर जिल्ह्यला द्रवयुक्त प्राणवायू पुरवठा रायगड जिल्ह्यातून करण्याचे राज्य सरकारने निष्टिद्धr(१५५)त करून दिले होते. मात्र त्या ठिकाणाहून होणाऱ्या मर्यादित प्रमाणात प्राणवायूचा होणारा पुरवठा तसेच वाहतुकीदरम्यान होणारा विलंब यामुळे जिल्ह्यत अनेकदा प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने काही पोलाद उत्पादकांकडून प्राणवायू पुरवठा करण्याची व्यवस्था केली तरीही दरम्यानच्या लाटेच्या शिखर काळात जिल्हा प्रशासनाने मिळेल, त्या किमतीत प्राणवायू घेतल्याचे या प्रकारावरून उघडकीस आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Buy oxygen ascending rate ysh

Next Story
नैसर्गिक नाला बुजविल्याने गालतरे रस्त्याला धोका
ताज्या बातम्या