वाडा: डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचा मोहोर गळून मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र विमा कंपनीने नुकसानभरपाईची रक्कम निम्मीच देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. मोठय़ा रकमेचा विमा घेऊन दिलेली रक्कम तुटपंजी मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत विमा कंपनीविरोधात पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे  तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 डिसेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचा मोहोर गळून गेला होता. त्यानंतर मार्चमध्ये मोठय़ा प्रमाणात आलेल्या उष्णतेच्या लाटेत थोडय़ा प्रमाणात लागलेले आंबेही गळून गेले होते. मोठय़ा प्रमाणावर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती.

या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून प्रति हेक्टर  ६५ हजार रुपये मिळणे क्रमप्राप्त असताना फक्त ३५ हजार रुपये देण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी २४ ऑगस्ट रोजी वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची भेट घेऊन  कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारीचे निवेदन त्यांना दिले आहे. 

जास्त रकमेचा हप्ता देऊनही निराशा

आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा पिकासाठी विमा कंपनी प्रति हेक्टरी २० हजार ३०० रुपयांचा हप्ता घेत असते. आंबा पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीची भरपाई प्रति हेक्टरी ६५ हजार  रुपये शेतकऱ्यांना मिळणे क्रमप्राप्त असताना निम्मीच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. विमा कंपनीने हप्तय़ाची रक्कम वाढविल्याने अनेक शेतकरी आपल्या फळपिकांचा विमा काढण्यासाठी पुढे येत नाहीत, असे सांगितले जात आहे.

आम्ही शेतकरी इतक्या मोठय़ा रकमेचा विमा हप्ता भरूनही तुटपुंजी नुकसानभरपाई मिळत असेल तर यापुढे शेतकरी फळ पिकांचा विमा कसा घेतील? 

-अनिल पाटील, कृषी भूषण शेतकरी, सांगे, ता. वाडा.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई विमा कंपनी त्यांच्या निकषांमधून ठरवत असते. त्यांचे चार निकष असतात. त्यामधील दोन निकष जुळलेले आहेत. त्याची भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित  दोन निकष जुळले तर पुढील भरपाई मिळेल. 

-दिलीप नेरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर जिल्हा.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling farmers insurance companies only half compensation mango growers ysh
First published on: 25-08-2022 at 00:02 IST