scorecardresearch

११ निवडणूक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

११ निवडणूक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गैरहजर राहणाऱ्यांविरोधात तहसीलदारांचा आक्रमक पवित्रा

पालघर: निवडणुकीच्या कामकाजाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालघरच्या तहसीलदाराच्या घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे इतर कर्मचारी धास्तावले आहेत. 

निवडणुकीच्या कामावर नेमणूक होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड विशिष्ट पद्धतीने केली जाते.  त्यामध्ये अधिक तर शिक्षकांचा समावेश असतो. निवडणुकीच्या प्रशिक्षणाला हजेरी लावल्यानंतर प्रत्यक्षात मतदान साहित्य गोळा करण्याच्या वेळी अनेक निवडणूक कर्मचारी जाणीवपूर्वक गैरहजर राहत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अनेकदा संबंधित कर्मचाऱ्यांचे नाव पुकारल्यानंतर देखील ही मंडळी अपेक्षित ठिकाणी हजर होत नसल्याचे दिसून आले आहे.  पालघर तालुक्यात १८ डिसेंबर रोजी आयोजित ३१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ५८५  कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. मात्र १७  डिसेंबर रोजी मतदान साहित्य घेणे कामी त्यापैकी ४६ कर्मचारी अनेकदा नाव पुकारल्यानंतर देखील हजर झाले नव्हते. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये साहित्य पाठवताना कर्मचारी संख्या कमी असल्याचे दिसून आले.

 पालघर तहसील कार्यालयाकडून  गैरहजर राहणाऱ्या ४६  कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर  संपर्क साधला असता   आणि मतदान केंद्रावर न पोहोचल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच   ४६ पैकी चक्क ३५ कर्मचारी यांनी आपली हजेरी दर्शवली.  परंतु तहसील कार्यालयात सायंकाळपर्यंत हजर न झालेल्या ११ कर्मचाऱ्यांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यामध्ये एक शाखा अभियंता यांच्यासह १० शिक्षकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक नोंदवहीत (सीआर) मध्ये देखील या गुन्ह्याची नोंद होणार असून अशीच पद्धत जिल्ह्यात यापुढे अवलंबली गेल्यास निवडणूक कामासाठी होणारे जाणीवपूर्वक गैरहजेरीचे प्रकार बंद होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इशारा देताच ४६ पैकी ३५ कर्मचारी हजर

 पालघर तहसील कार्यालयाकडून  गैरहजर राहणाऱ्या ४६   कर्मचाऱ्यांना पालघर तहसील कार्यालयाकडून दुपारनंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर  संपर्क साधण्यात  आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयात व सात वाजेपर्यंत नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर न पोहोचल्यास गुन्हा दाखल करण्याबाबत यावेळी सूचित करण्यात आले होते. प्रथमत: अनेकांनी आपण आजारी तर काहींनी घरी अडचणी वा इतर कारणे पुढे केली.  मात्र तहसीलदारांचा आक्रमक पवित्रा पाहून आणि धास्ती घेऊन  ४६ पैकी चक्क ३५ कर्मचारी यांनी आपली हजेरी दर्शवली. काही कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना सोबत आणले तर काही कर्मचारी माथेरान व सुट्टी निमित्ताने बाहेर गेलेल्या ठिकाणाहून धावत पळत तहसील कार्यालय गाठल्याची माहिती पुढे आली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 00:01 IST

संबंधित बातम्या