जातपडताळणी कार्यालय लाचखोरीचे कुरण?

पालघर जिल्ह्यतील जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थीकडून हजारो रुपयांची लाच मागितली जात असल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्हा जातपडताळणी कार्यालयात लाभार्थीची आर्थिक पिळवणूक  होत असल्चाचा आरोप

पालघर : पालघर जिल्ह्यतील जात पडताळणी कार्यालयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थीकडून हजारो रुपयांची लाच मागितली जात असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडून पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांना दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते यावरून हे कार्यालय लाचखोरीचे कुरण बनल्याचे समोर येत आहे.

मागासवर्गीयांच्या जात पडताळणीसाठी हे कार्यालय एक महत्त्वाचे कार्यालय आहे. जिल्हाभरातील मागासवर्गीय लाभार्थी या कार्यालयात ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करीत असतात. दररोज शेकडो अर्ज या कार्यालयाकडे पडताळणीसाठी प्राप्त होत आहेत. मात्र पडताळणीच्या नावाखाली अनेक त्रुटी व तांत्रिक चुका दाखवून लाभार्थ्यांकडून कागदपत्राचा तगादा लावला जातो कागदपत्रे नसल्यास आर्थिक मागणी केली जाते ही मागणी त्रयस्थ इसमाद्वारे केली जात आहे कागदपत्र नसल्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही त्यापेक्षा मागणी केलेले पैसे देऊन प्रमाणपत्र घेऊन टाकूया या भावनेने लाभार्थी मागणी केलेली रक्कम देत आहेत. त्यामुळे ही आर्थिक पिळवणूक असल्याचे आरोप विविध स्तरांतून होत आहेत

लाचखोरी थांबावी या उद्देशाने समाज कल्याण आयुक्त कार्यालयामार्फत जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अवलंबली होती. तरी या कार्यालयात लाभार्थीमार्फत कागदपत्रे सादर केल्यानंतर त्या पडताळणी प्रस्तावात अनेक त्रुटी व दोष दाखवून त्याद्वारे प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांकडून हजारो रुपयांची लाच मागितली जात आहे, विविध अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी लाचखोरी केल्याची चर्चा जोरात आहे.

लाचेची मागणी केल्याचे एक प्रकरण अलीकडेच उघडकीस आले असले तरी आतापर्यंत हजारो प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्र प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी व दोष दाखवून या कार्यालयातील अनेक अधिकारी व समिती अशा लाचेची मागणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अलीकडच्या काळात एका मागासवर्गीय लाभार्थीकडून त्याच्या प्रस्तावात दोष न दाखवण्यासाठी, वैध प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क वीस हजार रुपये इतकी लाच या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मागितली होती. मात्र लाभार्थी तक्रार करण्यासाठी घाबरत असल्याने हे प्रकरण उजेडात आले नव्हते.अनेक प्रकरणांमध्ये या अधिकाऱ्यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा असे गैरव्यवहार केलेले आहेत. आपले प्रमाणपत्र मिळणार नाही, या भीतीने लाभार्थीही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेली पैशांची मागणी पूर्ण करीत असल्याने ही बाब लक्षात आलेली नाही.

जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली आतापर्यंत अनेक मागासवर्गीय लाभार्थ्यांची दिशाभूल व फसवणूक व पिळवणूक करून या कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाली आहेत अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडे या बाबीचा तपास केल्यास या कार्यालयातील लाचखोरी चव्हाटय़ावर येऊ  शकते अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

जाचक व तांत्रिक त्रुटी काढून लाभार्थीची पिळवणूक केली जाते कार्यालयाबाहेर लाच घेऊ  नये किंवा देऊ  नये असे लिहिले असतानाही कार्यालयात लाचखोरीचा प्रकार सुरू असणे हा धक्कादायक व निंदनीय प्रकार आहे. जात पडताळणी समितीमध्ये स्थानिक स्तरावरील नागरिकांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश असल्यास ही पिळवणूक नक्कीच थांबेल असा विश्वास आहे.

नीलेश राऊत, सचिव, पालघर-डहाणू तालुका बौद्ध युवक मंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Caste office bribery square ysh