पालघर: पालघर विमानतळ प्रकल्पात स्थानिक मच्छिमारांचे हित जपले जावे अशी मागणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेत लावून धरल्यानंतर मच्छिमारांच्या समस्यांचा आणि पर्यावरणाचा अभ्यास केल्याशिवाय प्रकल्पाला मंजुरी नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ प्रकल्पाचा वेग वाढवतानाच स्थानिक मच्छिमारांच्या रोजगारावर गदा येणार नाही, याची काळजी घेण्याची आग्रही भूमिका पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी आज लोकसभेत मांडली. त्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी, “मच्छिमार आणि पर्यावरणाचा सर्वंकष अभ्यास (सर्वेक्षण) केल्याशिवाय प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार नाही,” असे आश्वासन सभागृहात दिले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात (Question Hour) खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी विकास आणि स्थानिक रोजगार यांचा समतोल राखण्याबाबत भर दिला.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत रास्त असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी त्यांची प्रशंसा केली. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, “विमानतळ जमिनीवर असो वा समुद्रात, त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी (Environment Clearance) बंधनकारक असते. खासदार यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि मच्छिमारांच्या हितासाठी सखोल सर्वेक्षण केले जाईल. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही केल्याशिवाय क्लिअरन्स दिला जाणार नाही.” असे त्यांनी आश्वस्ती केले. तसेच, राज्य सरकारने जागा निश्चित करून प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार तातडीने पुढील पावले उचलेल, असेही त्यांनी डॉ. सवरा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांचे आभार मानले.

डॉ. हेमंत सवरा यांनी उपस्थित केले प्रमुख मुद्दे:

  • प्रकल्पाचा पाठपुरावा: पालघर विमानतळाच्या उभारणीसाठी ‘साइट क्लिअरन्स’ (Site Clearance) मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आणून देत, केंद्र सरकारने राज्य सरकारशी समन्वय साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी खासदार सवरा यांनी केली.
  • मच्छिमारांसाठी खंबीर भूमिका: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराच्या जवळ समुद्रात (Offshore) विमानतळ उभारण्याची संकल्पना मांडली होती, याकडे डॉ. सवरा यांनी लक्ष वेधले. “जर विमानतळ समुद्रात होणार असेल, तर तेथील नैसर्गिक मासेमारी, मच्छिमार बांधव आणि मासेमारी क्षेत्रावर (Fishing Area) विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने मच्छिमारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?” असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.