पालघर: प्रत्येक बालकाला सुरक्षित, संरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क मिळावा या उद्देशाने समाजात जागरूकता निर्माण करून बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पालघर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि कामगार विभाग अथकपणे काम करत आहेत. हे दोन्ही विभाग समन्वयाने काम करून जिल्ह्यातील प्रत्येक मुलाचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाकडून शोधलेली १३८ बालके सध्या विविध बालगृहांमध्ये असून, कामगार विभागाकडून गेल्या दोन वर्षांत १४ धाडी टाकून १६ बालकांना बालमजुरीतून मुक्त करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बालकांच्या हक्कासाठी बालदिन साजरा होत असताना अनेकदा बालके रस्त्यावर, चौकात, रेल्वे स्टेशनवर, हॉटेलमध्ये किंवा भाजी विकताना दिसतात. या निराधार व कष्टकरी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य जिल्हा बाल संरक्षण कक्ष अत्यंत संवेदनशीलतेने करत आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अथवा इतरत्र काम करणाऱ्या मुलांशी प्रथम संवाद साधून त्यांना व त्यांच्या पालकांना समजावून सांगण्यात येते. जर मुले आपल्या पालकांसोबत आढळल्यास, त्यांना योग्य समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले जाते. मात्र, ज्या मुलांचे आई-वडील नसतात, ते बेपत्ता किंवा मुले स्वतः हरवलेली असतात असतात, अशा मुलांची रीतसर चाइल्ड वेल्फेअर कमिटीकडे नोंदणी करून त्यांची तात्पुरती व्यवस्था बालगृहात केली जाते.
सध्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाचे तीन बालगृहे कार्यरत आहेत. वसई येथे बालगृह (मुला-मुलींसाठी), बोईसर-नागझरी येथे रेस्क्यू फाउंडेशन (फक्त मुलींकरिता), आणि डहाणू-धुंदलवाडी येथे गिरीवनवासी बालगृह (मुला-मुलींकरिता) कार्यरत आहे. या बालगृहांमध्ये सध्या १३८ बालके आहेत. यापूर्वी बालगृहात दाखल झालेल्या अनेक बालकांच्या आई-वडिलांचा शोध लागल्यानंतर, योग्य समुपदेशन करून त्यांना पुन्हा कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जिल्हा बाल संरक्षण विभागाचे हे कार्य मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत १४ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून, त्यातून १६ बालकांना बालमजुरीतून मुक्त करण्यात आले आहे. नवजात अर्भक रस्त्यावर पडलेले आढळल्यास, पोलीस तपासात पालकांचा शोध न लागल्यास, त्या नवजात बालकाला देखील पुढील संगोपनासाठी बालगृहात ठेवले जाते.
कशी होते कारवाई
बालकामगार आढळल्यास जिल्हा बाल संरक्षण विभाग आणि कामगार विभाग एकत्रितपणे, पोलीस व शिक्षण विभागाच्या मदतीने कारवाई करतात. एखाद्या मुलाला काम करताना पाहिल्यास संबंधित व्यक्ती १०९८ वर संपर्क साधते, ही तक्रार जिल्हा बाल संरक्षण विभागाकडे येते. बाल संरक्षण विभागाचे पथक त्या ठिकाणी दोन-तीन दिवस गुप्त तपासणी करतात. बालक मजुरी करत असल्याचे निश्चित झाल्यावर बाल संरक्षण विभाग, कामगार विभाग आणि पोलिसांचे पथक धाड टाकून संबंधित मालकावर गुन्हा दाखल करतात व मुलाची सुटका करतात. सुटका केलेल्या मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील संगोपनासाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येते.
कायद्याचे कवच आणि कामाचे नियम
१४ वर्षांखालील बालके: या वयोगटातील मुलांना कोणतेही काम करण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. बालकांना कामावर ठेवणाऱ्या मालकावर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल होतो.
१४ ते १८ वर्षांवरील किशोरवयीन मुले: या वयोगटातील मुलांना काही नियमांच्या अधीन राहून काम करण्याची मुभा असली तरी, त्यांना धोकादायक ठिकाणी कामाला ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. यात फटाक्याचे कारखाने, गॅरेज, रसायन कारखाने, हॉटेलच्या किचनमधील कामे किंवा वजनी, कष्टाची कामे यांचा समावेश आहे.
जिल्हा बाल संरक्षण विभागाचे शिक्षणाचे आवाहन
जर १४ ते १८ वर्षांमधील किशोरवयीन मुले आपले शालेय शिक्षण घेऊन आर्थिक सहकार्यासाठी हलकी व धोक्याची नसलेली कामे करत असतील, तर अशा कामांना कायद्याने सूट आहे. आर्थिक परिस्थितीनुसार १४ ते १८ वर्षांवरील मुलांना हलकी कामे करावी लागत असल्यास, त्या मुलांनी रात्रपाळीच्या शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
बालदिनाचे खरे उद्दिष्ट
बाल दिन हा केवळ औपचारिकता न राहता, बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण कसे जबाबदार आहोत, याची जाणीव करून देणारा दिवस आहे. पालघर जिल्ह्यातील ही यंत्रणा मुलांना केवळ वाचवत नाही, तर त्यांना सुरक्षित निवारा, शिक्षण आणि सन्मानाचे जीवन मिळवून देण्यास मदत करत आहे. या बालदिनी, प्रत्येक नागरिकाने ‘बालरक्षणा’चा वसा घेऊन आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक मुलाकडे सहानुभूतीने पाहणे, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणे आणि आवश्यकतेनुसार १०९८ वर संपर्क साधून ‘चाईल्ड लाईन’ला सहकार्य करणे, हेच खरे बाल दिनाचे उद्दिष्ट आहे.
जेव्हा एखाद्या मुलावर संकट येते, तेव्हा चाइल्ड लाईन युनिटचा १०९८ हा क्रमांक मदतीचा पहिला हात ठरतो. आजारी, निवाऱ्याची गरज असलेल्या किंवा हरवलेल्या मुलांबद्दल, मारहाण किंवा अत्याचाराचे बळी ठरलेल्या मुलांबद्दल, काम करणाऱ्या मुलाला त्याची मजुरी नाकारली जात असल्यास अथवा रस्त्यावर दादागिरी करताना (धमकी देणे, उपद्रव करणे) दिसल्यास हा २४ तास कार्यरत असणारा क्रमांक मुलांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देतो. तसेच, ज्या स्वयंसेवकांना चाइल्ड लाईनला आपली सेवा देऊन या ‘बालरक्षण’ कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी पुढे यावे. – विनोद राठोड, जिल्हा बाल संरक्षण कक्ष
