scorecardresearch

तलासरीत मुद्रांकासाठी नागरिकांची वणवण; तालुक्यात मुद्रांक विक्रेतांचा तुटवडा

तलासरी तालुका असूनही एकही मुद्रांक विक्रेता नसल्याने परिसरातील २० गावांतील आदिवासी नागरिकांना डहाणू तसेच पालघर तालुक्यात फरफट करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

डहाणू : तलासरी तालुका असूनही एकही मुद्रांक विक्रेता नसल्याने परिसरातील २० गावांतील आदिवासी नागरिकांना डहाणू तसेच पालघर तालुक्यात फरफट करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे तलासरी तालुक्याला मुद्रांक विक्रेता (स्टॅम्प वेंडर) देण्याची नागरिकांची मागणी आहे.
तलासरी तालुक्यात लक्ष्मण वरखंडे यांच्याकडे मुद्रांक विक्रेता परवाना होता. मात्र त्याचा एप्रिल २०२१ मध्ये करोनामुळे मृत्यू झाला.त्यामुळे तलासरी तालुक्यात वर्षभरापासून मुद्रांक विक्रेता नाही. परिणामी, तालुक्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. वरखंदे यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रश्मी वरखंडे यांनी मुद्रांक उपसंचालक कोकण भवन यांच्याकडे मुद्रांक विक्रीसाठी अर्ज केला आहे, परंतु त्यांना परवाना मिळालेला नाही. तलासरी तालुक्यात अधिक खेडे, पाडे आहेत. विशेष म्हणजे दररोज हजारो नागरिकांना विविध शासकीय कामे करून घेण्यासाठी मुद्रांकाची आवश्यकता असते. केवळ शंभर रुपयांचा मुद्रांक विकत घेण्यासाठी नागरिकांना दोनशे ते चारशे रुपये खर्च करून डहाणूत यावे लागते. याकडे प्रशासनाने लक्ष्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुद्रांक विक्री हे काम निबंधक कार्यालयाकडे असून आपण त्यांना सूचना करू असे महसूल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील शेकडो नागरिक प्रतिज्ञापत्र, जातीचे, उत्पन्नाचे दाखले, बँक, शाळा, सिलिंडर, शिधापत्रिका, भाडोत्री करार तसेच जागा खरेदी-विक्री इत्यादी कामांसाठी मुद्रांक लागतात. ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी मुद्रांक मिळत नसल्याने दुसरऱ्या दिवशी काम सोडून पुन्हा खर्च करून डहाणूत यावे लागते. नागरिकांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकाची मागणी केल्यास ते संपल्याचे सांगितले जाते. आणि दुसऱ्या विक्रेत्याकडे पाठविले जाते.
डहाणूतील मुद्रांक विक्रेते शंभर रुपयांच्या मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. विक्रेते मुद्रांक असूनही सायवन, निंबापूर, बापूगाव, गडचिंचले या दुर्गम भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने ते त्रस्त आहेत. महसूल तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाने याकडे लक्ष्य देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
२० ग्रामपंचायतींत एकही विक्रेता नाही
पालघर जिल्ह्याच्या सीमेवर तलासरी आदिवासीबहुल तालुका आहे. तलासरी तालुक्याला दुर्गम भागातील २० ग्रामपंचायती जोडल्या आहेत. अडीच लाख लोकसंख्या असलेल्या तलासरीसारख्या आदिवासी मतदारसंघातील नागरिकांसाठी एकही परवानाधारक मुद्रांक विक्रेता नाही.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Citizens demand stamps bottom shortage stamp dealers taluka amy

ताज्या बातम्या