विनायक पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईसर : बोईसर शहरासह ग्रामीण भागांत अनेक अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. अशा तपासणी केंद्रांची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. तसेच तपासणीत किती अचूकता आहे यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीत रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ताप, सर्दी, खोकलासह इतर आजारांचे निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या रुग्णांना कराव्या लागतात. बोईसर व परिसरातील शिवाजीनगर, धोडी पूजा, अवधनगर, धनानीनगर, दांडी पाडा, गणेशनगर, काटकर पाडा, यादवनगर आदी ठिकाणी अशा लॅब सुरू आहेत. काही खासगी रुग्णालयांमध्ये देखील पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश लॅबचे मालक हे परप्रांतीय असून पदविका, पदवी घेऊन त्यांनी तपासणी केंद्र सुरू केल्याचे दिसून आले आहे. लॅबमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तसेच चाचणी अहवालावर सही करण्यासाठी अधिकृत, नोंदणीकृत एमडी पॅथॉलॉजिस्ट आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत एमडी पॅथॉलॉजिस्ट असणे यासाठी बंधनकारक आहे. मात्र मात्र बोईसर शहरासह ग्रामीण भागात कोणत्याही लॅबमध्ये अहवाल देण्यासाठी कौशल्य व मान्यता असणारे एमडी शिक्षण असणारे तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या असणारे लेटर हेडवर तपासणी अहवाल छपाई करून रुग्णांना देण्यात येते.

शहरातील अनेक लॅबमध्ये तर रक्त तपासताच अंदाजे अहवाल दिले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही रक्त तपासणीसाठी प्रक्रियेचा किमान कालावधी आवश्यक आहे. मात्र लॅब टेक्निशियन अवघ्या २० मिनिटांत कोणताही अहवाल देत असल्याचे दिसून आले आहे. पुरेशी पात्रता नसणारे बोगस लॅब तंत्रज्ञ (टेक्निशियन) अंदाजे अहवाल देतात व त्यावरून काही बोगस डॉक्टर रोग निदान झाल्याचे सांगून औषधांचा भडिमार रुग्णावर करत आहेत. बोईसर शहरासह शेजारील ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. बोईसरमध्ये गल्लीबोळात पानटपऱ्या थाटाव्या तशा पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. या लॅबमध्ये अनेक ठिकाणी डीएमएलटी कोर्स केलेले टेक्निशियन हे रक्त व इतर महत्त्वाच्या चाचणीचे अहवाल देत आहेत, तर अनेक ठिकाणी टेक्निशियनसुद्धा नसतानाही केवळ राखीव डिजिटल सहीद्वारे अहवाल रुग्णाच्या माथी मारले जात आहेत. पॅथॉलॉजी लॅबच्या मालकांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कार्यालयाकडून लॅब सुरू करण्यासाठी नोंदणी व परवानगी आवश्यक आहे. त्यांच्याकडे निर्मित होणाऱ्या जैविक घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे कायद्याने आवश्यक आहे. या सर्व बाबींकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन अनधिकृत सुरू असलेल्या लॅबवरती कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

रक्त तपासणी कुणी करावी?

रुग्णाची तपासणी करणारे डॉक्टर एमडी, डीसीपी, डीपीबी, पदवीपात्रच असायला हवेत. लॅबमध्ये प्रशिक्षित मान्यताप्राप्त डॉक्टर आहे का? याची विचारणा रुग्णाने केली पाहिजे. डीएमएलटी, सीएमएलटी हे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ लॅबमध्ये असायला हवेत.

बोईसरसह ग्रामीण भागातील पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत त्यांची सखोल चौकशी करून कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल.

डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

बोईसर शहरात अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. ग्रामीण भागांतील व शहरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबची तपासणी जिल्हा आरोग्य यंत्रणेने तात्काळ करावी आणि अवैधरीत्या सुरू असलेल्या लॅबविरुद्ध कडक कारवाई करावी.

अजित संखे, बोईसर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concern health citizens patients lives unauthorized pathology labs boisar ysh
First published on: 30-09-2022 at 02:29 IST