scorecardresearch

हवामान बदलामुळे बागायतदारांना चिंता

गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल होत आहे, कधी ऊन पडत आहे तर कधी रात्रीची  कडाक्याची थंडी पडत आहे.

अवकाळी पाऊस; आंबा, काजू पिके धोक्यात

कासा : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल होत आहे, कधी ऊन पडत आहे तर कधी रात्रीची  कडाक्याची थंडी पडत आहे. अशातच काल आणि आज जिल्ह्यामध्ये तलासरी, डहाणू तालुक्याच्या काही भागांत  ढगाळ  वातावरण होते तर काही ठिकांनी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.

या वर्षी आंबा, काजू बागांमध्ये चांगला मोहोर दिसून येत असतानाच पावसाने यावर पाणी फेरले आह़े. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी तलासरी तालुक्यासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.  तसेच गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे  पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे काजू, आंब्यावर आलेला मोहोरही करपण्याची भीती असल्याने बागायतदार  हवालदिल झाला आहे.  आंब्यासाठी केलेली फवारणी आणि इतर खर्चाचा भुर्दंड पडत असल्याची खंत बागायतदार व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, पावसाळी आणि ढगाळ वातावरण असल्यास आंबा, काजू या फळपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकांवर १२ ते ६३ टक्के रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास  कार्बेन्डाझिम अधिक मन्कोझेब ही औषधे १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचप्रमाणे  अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क करून मदत घ्यावी, असे आवाहन डहाणूचे कृषी अधिकारी कृष्णा पवार यांनी केले आहे.

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास..

फळांवर करपा रोग येण्याची शक्यता असल्यास बागेत कॉपर ओक्सीक्लोराइड २.५ ग्रॅम  किंवा कार्बेन्डाझिम  १ ग्रॅम प्रती लिटर पाणी अधिक स्टिकर १ मिलि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. ज्या बागेत तपकिरी तुडतुडे असतील अशा बागेत या फवारणीसोबत १० हजार पीपीएम अझाडीरेक्टिन ३ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. ही फवारणी संध्याकाळच्या वेळी करावी. आता बहुतेक बागेत मोहोराचे रूपांतर फळात झाले आहे. अशा बागेला दर पंधरा दिवसांनी पाणी देणे सुरू करावे. फळे वाटाणा,लिंबू व अंडय़ाच्या आकाराची झाल्यावर १३ : ०  : ४५ व ० : ५२ : ३४  ही पोषक खते फवारणीतून ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावीत. यामुळे फळे गळण्याचे प्रमाण कमी होऊन फळांचा आकार वाढायला मदत होईल.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Concerns gardeners climate change unseasonal rain ysh

ताज्या बातम्या