पालघर : वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या मनोर-वाडा-भिवंडी या मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या जोमाने सुरू असून मनोर ते वाडा दरम्यानच्या आठ किलोमीटरच्या एकामार्गिकेचे अंतर तसेच वाडा डाकिवली दरम्यान संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
मनोर ते भिवंडी या ५५ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे कॉंक्रिटीकरण, पुलांची दुरुस्ती व इतर संबंधित कामांसाठी ८०१ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. यादरम्यान जुन्या रस्त्याचे खोदकाम करून प्रत्येक मार्गीकेवर नऊ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता उभारण्याचे निश्चित आहे.
पालघर जिल्ह्यात वाडा ते डाकिवली या २०.२० किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर सुरू झाले असून या पट्ट्यातील एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच पट्ट्यातील दुसऱ्या मार्गीकेच्या काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी संपवण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
मनोर ते वाडा या २३.४०० किलोमीटर अंतराच्या पट्ट्याच्या काँक्रिटीकरणाचे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये सुमारे सहा किलोमीटर लांबीचे एका मार्गीकेचे खोदकाम झाले असून पावसाळ्यापूर्वी मनोर वाडा दरम्यान आठ किलोमीटर एका मार्गिकेचे काँक्रीटिकरण्याचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या रस्त्यांपैकी सुमारे साडेतीन किलोमीटरचा पट्टा वनविभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असून या कामे पाठपुरावा केला जात आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान डाकिवली ते भिवंडी दरम्यानचे अंतर सुमारे ११ किलोमीटर असून त्यापैकी वडवली पर्यंतच्या चार किलोमीटर अंतराचे चौपदरी, कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.
गेली काही वर्ष व विशेषतः मागील वर्षी मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तसेच अनेक जीवघेणे अपघात या पट्ट्यात घडल्याने लोकांचा व सामाजिक संस्थांचा रोष उफळून आला होता. ज्या पट्ट्यांमध्ये पाणी साचून रस्त्याची दुरावस्था होते त्या पट्ट्यांमध्ये प्राधान्याने काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
पुलांची दुरुस्ती
मनोर वाडा रस्त्यावर देहर्जा व पिंजाळ या नद्यांवरील पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या खेरीज या मार्गावरील मोऱ्या, लहान व मोठे पूल यांची देखील दुरुस्ती व आवश्यकतेनुसार रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी मोठा खर्च
वाडा भिवंडी मार्गीकेवर अस्तित्वात असलेल्या विद्युत वाहिनी व केबल रस्त्याच्या बाजूला हलविण्यासाठी आरंभी ६७ कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत करण्यात आला होता. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात संयुक्त पाहणी करून हा खर्च प्रथम ३३ कोटी रुपये व नंतर २२.६३ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कामांमध्ये ओव्हरहेड वायर क्रॉसिंग, पोल शिफ्टिंग, अंडरग्राउंड केबल टाकणं इत्यादी कामांचा समावेश आहे

