scorecardresearch

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल;चार वर्षांपासून वेतनवाढ नाही, अतिरिक्त कामाचा ताण

पालघर जिल्ह्यात तालुका प्रशासनात कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर काम करणारे अधिकारी कर्मचारीवर्ग वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

पालघर : पालघर जिल्ह्यात तालुका प्रशासनात कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर काम करणारे अधिकारी कर्मचारीवर्ग वेतनवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांची वेतनवाढ रोखल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. याचबरोबरीने कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असताना अनेक पदांचा पदभार या कर्मचाऱ्यांकडे दिला जातो. मात्र वेतन एकाच पदासाठी दिले जाते. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे.
तालुकास्तरावर डाटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ अभियंता, एमआयएस समन्वयक, विषयतज्ज्ञ शिक्षक, अपंगांसाठी नेमलेले विशेषतज्ज्ञ शिक्षक आदी पदांवर हे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. वाढत्या महागाईमुळे त्यांना आता मिळत असलेल्या वेतनावर काम करणे अवघड जात आहे. या आधीच पालघर जिल्ह्यात गेल्या सात वर्षांपासून नोकरभरती रखडली आहे. खासगी ठिकाणीही नोकरी मिळणे मुश्कील झाले आहे. अशा वेळी या पदांच्या बोजाखाली नाइलाजाने काम करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे ११० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर काम करीत आहेत. पंचायत समिती स्तरावर अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्या पदांचा अतिरिक्त पदभार या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा तणाव आहे. काम मोठय़ा प्रमाणात असले तरी त्याच्या तुलनेत मिळणारे वेतन अत्यल्प आहे.
तालुक्याला असलेले कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणीही काम करीत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी ५ टक्के वेतनवाढ होत होते. मात्र त्यानंतर ती अचानक बंद झाल्यामुळे आता मिळत असलेल्या वेतनावर काम करणे या कर्मचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मूळ पदावर प्रामाणिकपणे काम करत असले तरी त्यांच्यावर विविध पदाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या लादून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहेत. त्यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली असल्याचे ते सांगत आहेत. एकाच पदावर असताना विविध पदांची कामे करून वेतनही तुटपुंजे मिळत आहे. त्यामुळे आमच्यावर एकाच पदाचा कार्यभार द्यावा अन्यथा वाढत्या महागाईमध्ये वेतन अत्यल्प असल्यामुळे वेतन वाढवून मिळावे, अशी मागणी कर्मचारीवर्गाने केली आहे.
दरम्यान, एकाच पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले असताना अनेक पदांचा भार दिला जात आहे. याउलट मिळणारे वेतन अत्यल्प व न परवडणारे आहे. गेल्या चारं७ वर्षांपासून वेतन वाढवून देण्यात आलेले नाही अशी प्रतिक्रिया-पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याने दिली आहे.
आर्थिक अडचणी


कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीस हजारांच्या जवळपास वेतन आहे. यामध्ये विषयतज्ज्ञ शिक्षक, अपंगांसाठी विशेषतज्ज्ञ शिक्षक (मोबाइल टीचर) यांना त्यापेक्षाही कमी वेतन दिले जाते. विषयतज्ज्ञ शिक्षकांना केंद्रप्रमुखांसारखी विविध कामे असतात. यामध्ये शाळांना भेटी देणे, विद्यार्थी शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे आदींचा समावेश असतो. तर विशेष शिक्षक यांना अपंगांशी संबंधित सर्व ती कामे करावी लागत आहे. या शिक्षकांना भेटीसाठी ग्रामीण भागात प्रवास करावा लागतो. त्यामुळे खासगी प्रवास भाडेही जादा खर्च होते. सध्या एसटी बंद असल्याने खर्चीक प्रवास करून शिक्षकांना जावे लागत आहे. त्याचा परिणाम वेतनावर होतो व कुटुंबाच्या उदरनिर्वाहामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.


पगारासाठी पैशांची मागणी?

कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांना वेतनही वेळेवर उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना पदरचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागतो. एप्रिल उजाडला असला तरी काही जणांचा फेब्रुवारीपर्यंतचा वेतन जमा झालेला नाही. जिल्हा कार्यालयातील काही जण या शिक्षकांना पगार अदा करण्यासाठी पैशांचा तगादा लावत असल्याची जोरदार चर्चा आहे. हे पैसे दिल्यानंतर त्यांचे वेतन दिले जाते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Condition contract workers pay years extra work stress taluka administration district contract staff amy