Construction 11571 shelters in the district end of March Strive dynamic quality improvement ysh 95 | Loksatta

जिल्ह्यात मार्चअखेर ११५७१ घरकुलांची उभारणी; गतिमान, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न

योजनेतील कामाची गुणवत्ता वाढीसाठी तसेच योजना गतिमान करण्यासाठी सामाजिक संस्थेचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात मार्चअखेर ११५७१ घरकुलांची उभारणी; गतिमान, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न

पालघर : अमृत महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुले उभारली जात आहेत. जिल्ह्यात मंजूर ११५७१ घरकुले मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजनेतील कामाची गुणवत्ता वाढीसाठी तसेच योजना गतिमान करण्यासाठी सामाजिक संस्थेचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०१६ ते २०२१ यादरम्यान ९३८ घरकुलांचे बांधकाम प्रलंबित आहे. या योजनेअंतर्गत या वर्षी मंजूर झालेल्या आठ हजार ७१० घरकुलांपैकी ८४०१ घरकुलांचे काम प्रलंबित आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेत २०१६ पासून विद्यमान वर्षांपर्यंत २२३२ घरकुले अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत.

महाआवास अभियानअंतर्गत आशियाना प्रकल्पअंतर्गत बांधलेल्या घरकुलांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.   उद्दिष्टांप्रमाणे शंभर टक्के मंजुरी देणे व त्यासाठी मंजुरीपत्र तात्काळ देऊन घरकुलांचे काम सुरू करणे, लाभार्थीना सात दिवसांच्या पूर्वी पहिल्या हप्तय़ाचे वितरण करणे आदी कामांची जबाबदारी गटविकास अधिकारी व साहाय्यक लेखा अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर लाभार्थीना मनरेगा मस्टरवर नोंद करणे, टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरित करणे तसेच इच्छुक लाभार्थीना वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळवून देण्यास सहकार्य करणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिली. घरकुल उभारणीसाठी मंजुरीपासून लागणारा २५० ते ३०० दिवसांचा अवधी १०० दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सामाजिक संस्था यांची मदत घेऊन स्वयंपाकघर व बाथरूम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीची उपलब्धता करणेकामी प्रयत्न सुरू आहेत.

घरकुल उभारण्यासाठी साहित्य सहजगत्या उपलब्ध व्हावे म्हणून घरकुल मार्ट, रेतीसाठा बँक आणि डेमो हाऊस तयार करण्यासाठी तालुकास्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच घरकुल उभारणीसाठी गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमदेखील हाती घेण्यात आले आहेत. महाआवास अभियानांतर्गत सुमारे १२०० घरे पूर्वीच्या आर्थिक वर्षांतील प्रलंबित असून काही लाभधारकांचा मृत्यू झाल्याने अथवा स्थलांतर झाल्याने त्यांची पूर्तता करण्यास अडचण आहे. याखेरीज काही लाभधारकांकडे जागा उपलब्ध नसल्याने त्यांना अन्य योजनेतून अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

प्रशासनाचे प्रयत्न

  • ग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी.
  • अधिकारी-कर्मचारी वर्गाला गतिमान करणे.
  •   शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था यांच्याबरोबर समाजातील इतर सर्व घटक यांचा सहभाग वाढवणे.
  • लाभधारकांची क्षमताबांधणी करणे व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे
  •   शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे.
  •   उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 01:22 IST
Next Story
वीज दरवाढीमुळे कारखान्यांचे स्थलांतर; पाच वर्षांत वाडा तालुक्यातून १७ उद्योग गुजरात, मध्य प्रदेशात