scorecardresearch

सामान्य रुग्णांना उपचारांची प्रतीक्षा

आरोग्य केंद्रात करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, तरीही या ठिकाणी सामान्य आजारांच्या रुग्णांना उपचार सुविधा पुरवण्यास सुरुवात झालेली नाही.

पालघरमधील करोना रुग्णसंख्या नगण्य; अन्य उपचारांच्या सुविधेबाबत चालढकल

पालघर: वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सर जे. जे. रुग्णालयांतर्गत पालघर येथे सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, तरीही या ठिकाणी सामान्य आजारांच्या रुग्णांना उपचार सुविधा पुरवण्यास सुरुवात झालेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील विविध आजारांच्या रुग्णांची परवड होत आहे.

जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या वैद्यकीय अधिकारी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने पालघर आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण विभाग, दंतचिकित्सा, गर्भवती तपासणी, लसीकरण, प्रयोगशाळा तसेच आंतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सन २०१९ मध्ये या आरोग्य पथकाच्या पालघर केंद्रात दररोज सरासरी ६० रुग्णांवर उपचार करण्यात आले तर सन २०२० मध्ये एप्रिलपर्यंत या वैद्यकीय सुविधेच्या ठिकाणी दररोज सरासरी ४० रुग्ण उपचारांसाठी येत होते. मात्र ही वास्तू धोकादायक बनल्याने येथील काही विभाग बंद करण्यात आले. तसेच एप्रिल २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने हे रुग्णालय पूर्णपणे बंद करण्यात आले.  नंतर लसीकरणासाठी या केंद्राचा काही भाग वापरण्यात येत होता. करोनाच्या तिसऱ्या लाटेत येथे प्राणवायूची सुविधा उपलब्ध करून उपचार केंद्र सुरू करण्यात आले. मात्र आता तिसरी लाट ओसरल्यानंतरही हे उपचार केंद्रच सुरू असून सामान्य आजारांच्या उपचार सुविधा बंदच आहेत. 

आरोग्य पथकासह उमरोळी, केळवे, बंदाठे, वडराई, शिरगाव व खारेकुरण या सहा उपकेंद्रांना स्थानिक नागरिक वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम सुरू करण्यात आले असून या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. आरोग्य पथकातील काही कर्मचारी व पदाधिकारी हे लसीकरण मोहिमेत तसेच करोना उपचार केंद्रामध्ये कार्यरत असून पालघर येथील आरोग्य पथकाच्या सुविधा पूर्ववत सुरू झाल्यास नागरिकांना लाभदायक ठरणार आहे.

यासंदर्भात आरोग्य पथकाच्या अधीक्षक पल्लवी उपलभ यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य पथकांतर्गत उपकेंद्रातील सेवा दोन महिन्यांपूर्वी पूर्ववत झाल्या असून त्यामध्ये कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. पालघर येथील केंद्र सर्वसाधारण रुग्णांसाठी खुले करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यास पालघर येथील केंद्रदेखील सुरू करण्यात येईल, असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.

करोना योद्धय़ांना साधे प्रशस्तिपत्रक नाही

आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी करोनाकाळात रुग्णांच्या उपचारासाठी, लसीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. इतर वैद्यकीय विभागांना करोनाकाळातील सेवेबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले असताना आरोग्य पथकातील कर्मचारी दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona patients in palghar health center no treatment for general patients zws

ताज्या बातम्या