‘त्या’ नवजात बाळाचा मृत्यू | Loksatta

‘त्या’ नवजात बाळाचा मृत्यू

मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते.

‘त्या’ नवजात बाळाचा मृत्यू
करोना प्रातिनिधिक छायाचित्र

पालघर :  पालघर जिल्ह्यात करोनाबाधित नवजात बाळावर उपचाराची सुविधा न मिळालेल्या त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. नाशिक येथील रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  गेले सहा दिवस हे बाळ मृत्यूशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

पालघर तालुक्यातील सफाळे दारशेत येथील राहणाऱ्या अश्विानी काटेला यांनी सात दिवसांपूर्वी पालघर शहरातील एका खासगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला होता.  मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते. त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची प्रतिजन चाचणी केल्यानंतर बाळाचा चाचणी अहवाल सकारात्मक तर मातेचा अहवाल नकारात्मक आला होता. पालघर तसेच जव्हार   रुग्णालयात उपचारासाठी सुविधा नसल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळ वजनाने कमी असल्याने तसेच बाळाच्या शरीरात जंतुसंसर्ग झाल्याने ते आणखीन अत्यवस्थ झाल्यामुळे  त्याचा मृत्यू झाला.

चाचणी अहवालात तफावत

नाशिक जिल्हा रुग्णालयाने या बाळावर योग्य पद्धतीने उपचार केले होते. मात्र आरोग्याच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण झाल्याने बाळ दगावले असे सांगण्यात आले. येथे बाळाची व मातेची ‘आरटीपीसीआर’ चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल आला.  जव्हार येथे बाळाची प्रतिजन चाचणी दोनदा सकारात्मक आली होती, असे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले होते. पालघर येथील खासगी रुग्णालयाच्या अहवालात देखील  बाळ सकारात्मक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आरोग्य विभाग या प्रकरणात लपवालपवी करीत असल्याचे आरोप होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2021 at 00:27 IST
Next Story
महामार्गावर तीन दिवसांत दोन अपघात