scorecardresearch

जिल्ह्य़ातील ग्रामीण भाग निर्बंध शिथिलतेपासून दूरच; महापालिका क्षेत्र वगळल्याने टक्केवारीत घसरण

राज्य शासनाने ४ मार्चपासून निर्बंध शिथिल करताना लसीकरण टक्केवारी, करोना रुग्णवाढ दर तसेच प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाण याद्वारे उद्दिष्ट ठेवले आहे.

महापालिका क्षेत्र वगळल्याने टक्केवारीत घसरण

पालघर:  पालघर जिल्ह्यातील पहिली लस मात्रा ८८ टक्के नागरिकांनी घेतली असून दुसरी लस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र राज्य शासनाने करोना निर्बंधामधील शिथिलतेत  महानगरपालिकांना वगळल्याने टक्केवारी घसरून   जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंध शिथिलतेच्या उद्दिष्टांपासून  दूर राहिला आहे. 

राज्य शासनाने ४ मार्चपासून निर्बंध शिथिल करताना लसीकरण टक्केवारी, करोना रुग्णवाढ दर तसेच प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाण याद्वारे उद्दिष्ट ठेवले आहे.  वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित पालघर ग्रामीण जिल्ह्याच्या रुग्ण वाढ दर तसेच प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आहे.

जिल्हा शासकीय उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याच्या जवळपास आली असताना महानगरपालिका क्षेत्र वगळल्याने ग्रामीण भागातील पहिल्या लस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ८५ टक्क्यांवर मर्यादित राहिले आहे.  दुसरी लस मात्रा घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अवघ्या ६२ टक्क्यांवर असल्याने  निर्बंध शिथिलता मिळण्यास सध्याच्या निकषांवरून बराच अवधी लागण्याची शक्यता  आहे.   जिल्ह्यातील पहिली लस मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरीही केंद्रस्तरावर उपलब्ध माहितीचे संकलन घातल्यानंतर ही टक्केवारी वाढेल असे सांगण्यात येते

वर्धक मात्राकडे पाठ

विरार :  वसई-विरार शहरातील करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने कमी झाल्याने नागरिकांनी वर्धक मात्रेच्या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. सध्या केवळ ४९ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 

पालिकेने एकूण ११४ टक्के नागरिकांना  पहिली मात्रा दिली तर ९७ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा दिली आहे. यात पालिकेने आरोग्य सेवक, पहिल्या फळीतील सेवक आणि ६० वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांसाठी वर्धक मात्रा उपलब्ध केली आहे. या गटातील दोन मात्रा पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना तिसरी वर्धक मात्रा देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार पालिका या गटातील नागरिकांचे लसीकरण करत आहे.

वैद्यकीय विभागाच्या लसीकरण भागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १० हजार ३७५  आरोग्यसेवकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीतील ९ हजार ८६० नागरिकांना वर्धक मात्रा दिली आहे तर ६० आणि त्याहून अधिक व्याधिग्रस्त १३ हजार १११ नागरिकांना वर्धक मात्रा दिली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona patient rural areas district from restricted laxity akp

ताज्या बातम्या