नगर परिषदेकडून बांधकाम परवानगीस टाळाटाळ प्रकरण

डहाणू : डहाणूच्या मल्याण लोणीपाडा येथे एका जागामालकाला बांधकामासाठी दिलेली तात्पुरती परवानगी कायम करताना त्यासाठी तांत्रिक अडचणी सांगून पैशाची मागणी करणाऱ्या डहाणू नगर परिषदेवर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी किती बांधकाम परवानग्या दिल्या त्यांची संपूर्ण चौकशी आणि संबंधित चार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मल्याण लोणीपाडा येथे जुबीन इराणींची जवळपास पाच एकर जागा आहे. मुख्याधिकारी विजय द्वासे यांच्या काळात प्लॉट पाडण्यास तात्पुरती परवानगी घेतली होती. त्याचा रीतसर सरकारी भरणा करण्यात आला होता.   तात्पुरती परवानगी कायम करण्यासाठी नगर परिषदेकडे मागणी केली असता प्रभारी मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता, नगररचनाकार आणि लिपिक यांनी या जागेस परवानगीसाठी तांत्रिक अडचण  सांगून मोठय़ा रकमेची मागणी केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी  इराणी यांनी   न्यायालयात धाव घेतली होती.   प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी डहाणू, कनिष्ठ अभियंता, लिपीक यांच्याविरोधात तक्रार केली होती.  न्यायालयाने   बांधकाम परवानगी देण्याचे आदेश दिल्यानंतर  नगर परिषदेने तात्काळ दुसऱ्या दिवशी बांधकाम परवानगी दिली.

न्यायालयाच्या आदेशाचा आपण आदर करतो. दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आमचा पक्ष कोणत्याही भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही. आपण यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा याबाबत कळवले आहे.

– भरत राजपूत, नगरध्यक्ष, डहाणू नगर परिषद