पालघर : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला.

चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता.

सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्कस, देवस्थान, इनामी व सरकारी जमिनी वर आदिवासी बांधव कसत असून या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश व कायदे असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वन हक्क दाव्या अंतर्गत चार हेक्टर पर्यंत क्षेत्रफळाची जागा देण्याची तरतूद असताना हजारो वन हक्क दावे नाकारण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या वनसंरक्षण कायद्यामुळे सन २००६ च्या वन हक्क दावे संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी व बिगर आदिवासी बांधवांच्या ताब्यात असलेल्या व ते कसत असलेल्या जमिनींचा त्यांच्या नावावर वर्ग व्हाव्यात यासाठी प्रामुख्याने आंदोलन छेडल्याचे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले. असे झाल्यास आदिवासी बांधवांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणे शक्य होईल, कर्ज मिळू शकेल तसेच विविध प्रकल्प अंतर्गत जागा जात असल्यास त्याचे लाभ मिळू शकतील या दृष्टीने राज्य सरकारचे आदेश व यासंदर्भातील कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारने मनरेगा कायदा रद्द करून जी- राम- जी या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पूर्वीच्या तुलनेत नागरिकांना १०० ऐवजी १२५ दिवसां चा रोजगाराची हमी मिळणार असली तरीही पूर्वी राज्य सरकारच्या या योजनेतील १० टक्के आर्थिक सहभाग ४० टक्क्यांवर नेऊन ठेवला आहे. महाराष्ट्र सह इतर राज्य सरकारांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना या योजनेसाठी आर्थिक बोजा उचलण्याची क्षमता नसल्याने सर्वसामान्य नागरिक या रोजगाराच्या हमीपासून वंचित राहील याकडे त्यांनी लक्षवेधले. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे या आंदोलनातील प्रमुख मागणी असल्याचे डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

महावितरण तर्फे ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जात असून त्यामुळे वीज देयके काही पटीने वाढले आहेत. महावितरण कंपनीने भांडवलदारांना मिळणारा नफा व त्यामुळे होणारी जनतेची लूट थांबवावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे अनेक मोठी स्तोत्र असताना पालघर मधील पाणी इतरत्र नेले जात आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यातील अवघे दोन टक्के जमीन ओलिताखाली असून राज्यातील सिंचनाखालील १८ टक्के तर देशातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली असताना पालघर व ठाणे जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पालघरचे पाणी गुजरात व अन्य राज्यात नेण्याला आपला विरोध असून या स्थानीय मुद्यांसह शिक्षण, रेशन, आरोग्य, रोजगार, पेसा नोकर भरती सारखे प्रश्न सुटेपर्यंत व त्याबाबत समयबद्ध स्वरूपात लेखी वचन देईपर्यंत हे आंदोलन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुरू ठेवण्याचा निर्धार कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केला. या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारने सकारात्मकता न दाखवल्यास हे आंदोलन मुंबईच्या दिशेला वळवण्याचे अथवा त्याचे रेल रोकोमध्ये परिवर्तन करण्याचे विचार करण्यात येईल असेही सांगण्यात आले. पालघर प्रमाणेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात अशा स्वरूपाचे आंदोलन पक्षाच्यावतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालघर मध्ये लाल बावट्याचे वादळ दाखल

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा पालघर मध्ये दुपारपर्यंत दाखल होईल असे वाटत असताना सायंकाळी उशिरा ३५ हजार पेक्षा अधिक आंदोलनकर्ते पालघर शहरात दाखल झाले. पालघर जिल्हा मुख्यालय संकुलाच्या मार्गावर मोर्चेकरी दाखल होणार असून हा मोर्चा स्थानीय स्तरावरील समस्या सुटेपर्यंत अनिश्चित काळ सुरू राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.