crash attenuater installed at cryus mistry accident spot zws 70 | Loksatta

पालघर: सायरस मिस्त्री यांच्या अपघात ठिकाणी धक्का शोषक यंत्रणा कार्यान्वित

या अपघात समयी सीट बेल्ट परिधान न केल्याने सायरस मिस्त्री व अन्य एका सहप्रवाशाचे निधन झाले होते.

पालघर: सायरस मिस्त्री यांच्या अपघात ठिकाणी धक्का शोषक यंत्रणा कार्यान्वित
सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषण करणार यंत्रणा (क्रॅश अटेन्यूअटर)कार्यान्वित

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाला जबाबदार असणाऱ्या सूर्य नदीवरील पुलाच्या कठड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धक्का शोषण करणार यंत्रणा (क्रॅश अटेन्यूअटर)कार्यान्वित केली आहे. एकीकडे या अपघाताला वाहनाचा मर्यादेपेक्षा अधिक वेग जबाबदार असल्यानेपोलिसात गुन्हा नोंदवला गेला असताना दुसरीकडे महामार्गावरील रचनेत दोष असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.

तीन महिन्यांपूर्वी (४ सप्टेंबर २०२२ रोजी) टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री प्रवास करीत असलेल्या गाडीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू चारोटी पासून काही अंतरावर सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला आदळली होती. या अपघात समयी सीट बेल्ट परिधान न केल्याने सायरस मिस्त्री व अन्य एका सहप्रवाशाचे निधन झाले होते.

या अपघाताची पोलीस, परिवहन विभाग, वाहन बनवणाऱ्या मर्सिडीज कंपनीच्या पथकाकडून तसेच इतर तज्ञांकडून तपासणी करण्यात आली असता वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याने अपघात झाल्याचा दोषारोप ठेवून वाहन चालवणाऱ्या डॉ. अनहिता पंडोल यांच्या विरुद्ध ५ नोव्हेंबर रोजी कासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्गावर सूर्या नदीच्या पात्राच्या पूर्वी अचानकपणे रस्ता विभागाला गेल्याने भरधाव जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तसेच धोकादायक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढत डॉ. अनिता पंडोल यांच्या विरोधात हलगर्जीपणा, बेदरकारपणे वाहन चालविणे व इतर व्यक्तीचा जीव धोका टाकण्याचे कलमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरलेल्या सूर्या नदी पुलाच्या काँक्रीट कठड्यापूर्वी धक्का शोषून घेणारी यंत्रणा अर्थात क्रॅश अटेन्यूअटर (क्रश कुशन) कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत भरधाव वाहन आढळल्यास अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी धक्का शोषण यंत्रणा असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या अपघातात महामार्गावरील तांत्रिक त्रुटी असल्याचे अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. या प्रमाणे याच महामार्गावर वैतरणा व तानसा नदी वरील पुलावर तसेच इतर आवश्यक ठिकाणी अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

चारोटी पुलाचे वळण धोकादायक

सायरस मिस्त्री यांचा अपघात घडला त्या ठिकाणापूर्वी काही अंतरावर चारोटी येथील उड्डाणपूल असून या पुलावर धोकादायक वळण आहे. त्या ठिकाणी वारंवार भिषण अपघात होत असून अनेकदा जीवित हानी झाली आहे.या ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी विविध स्तरावर मागणी करण्यात येत असली तरीही त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वाढीव सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. या खेरीज या महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) असताना सायरस मिस्त्री यांचे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणीच महामार्ग प्राधिकरणाने लक्ष दिले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:37 IST
Next Story
पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या साथीने शिंदे गट-भाजपाचे नवीन सत्तासमीकरण