बोईसर : पाण्यासाठी झालेल्या वादातून आदिवासी पाडय़ातील महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा उपसरपंच आणि त्याच्या कुटुंबातील एकूण सात जणांवर डहाणू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील नवनाथ कोहराळीपाडा या आदिवासी पाडय़ात ६ मार्च रोजी बोअरवेलमध्ये पाण्याची मोटर बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता.
या वादात गंजाड-नवनाथ ग्रुप ग्रामपंचायतीचा उपसरपंच कौशल कामडी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सहा जणांनी निर्मला वायेडा, मधुश्री धिंडे, गीता वायेडा, मायाश्री वायेडा, कनुश्री वायेडा आणि लता धिंडे, मंगेश वायेडा, सुनील वायेडा यांना दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत महिलांचे सोन्याचे दागिनेही गहाळ झाले होते. डहाणू पोलिसांनी उपसंरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सात जणांवर यांच्यावर विविध कलमांनुसार डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.