scorecardresearch

सौरऊर्जा प्रकल्पात कोटय़वधींचा चुराडा ; ग्रामीण रुग्णालयात असलेले सौर ऊर्जा प्रकल्प अकार्यक्षम

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विजेचा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली.

सौरऊर्जा प्रकल्पात कोटय़वधींचा चुराडा ; ग्रामीण रुग्णालयात असलेले सौर ऊर्जा प्रकल्प अकार्यक्षम

नीरज राऊत/ विजय राऊत
पालघर/कासा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात विजेचा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली. मात्र ती कार्यक्षम न झाल्यामुळे खर्च केलेल्या कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला आहे. जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालय तसेच १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली आहे.

आरोग्य सेवा परिवहन विभाग पुणे यांनी २, ४, ३, ६ व ५ केव्हीए क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी दोन वेगवेगळय़ा आस्थापनांना जानेवारीमध्ये कार्यादेश दिले होते. त्यानुसार २.४ केव्हीए क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे नऊ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. काही ठिकाणी हा खर्च केल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये १२ ते १५ सौर ऊर्जा पॅनल सह ७० ते ८० बॅटरी बसवण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे बॅटरी ठेवण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये जागेची कमतरता असल्याने तत्कालीन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार यांनी ही प्रणाली बसवण्यास विरोध दर्शवला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र पुणे येथील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश दिले गेल्याने ही प्रणाली नाईलाजाने बसवल्याचे म्हटले जाते.

सध्या जिल्ह्यात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडत असल्याने सौर ऊर्जेची निर्मिती अत्यंत मर्यादित प्रमाणात होत आहे. त्यामुळे ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी असणाऱ्या बॅटरी व्यवस्था कार्यक्षम नसल्याचे कारण पुढे ठेवण्यात येत आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्रांमध्ये ही यंत्रणा भर उन्हाळय़ातदेखील सक्षमरित्या कार्यरत नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पाच वॅट क्षमतेचे चार किंवा पाच दिवे जेमतेम तास-दोन तास कार्यरत राहतो. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाल्यास आरोग्य केंद्रातील रुग्ण अंधारामध्ये राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी बुधवारी कासा उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट दिली असता संपूर्ण रुग्णालय विद्युत पुरवठय़ाशिवाय अंधारात असल्याचे दिसून आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर सौर ऊर्जा प्रणाली कार्यक्षम नसल्याचे उत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दिले.
दरम्यान कासा रुग्णालयात चतुर्थ श्रेणीचे पाच तर डहाणू व जव्हार रुग्णालयात या श्रेणीमधील ११ कर्मचारी पद रिक्त असून विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटर सुरू करण्यास विलंब लागत असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच येथील कर्मचारी अनेक कामांमध्ये व्यापले गेले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शासनाने कोटय़वधी रुपयांचा निधीचा खर्च करून उभारलेल्या सौर ऊर्जा प्रणाली कार्यक्षम पद्धतीने सुरू नसल्याने या प्रकरणी चौकशी करावी व संबंधितांना ती दुरुस्त करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार श्रीनिवास वनगा यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

आरोग्य केंद्रांचा समावेश
कासा, डहाणू व जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयांसह तलासरी, पालघर, वाणगाव, विरार, विक्रमगड व वाडा या सहा ग्रामीण रुग्णालयाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर दांडी, एडवण, केळवे, माहीम, सातपाटी, साखरशेत, आशागड, घोलवड, जामसर, खोडाळा, कुझें, सफाळा, सोमटा, तारापूर, गंजाड, सायवरी व तलवाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

तलासरी व पालघर प्रणाली कार्यरत
या संदर्भात पालघरचे शल्य चिकित्सक संजय बोदाडे यांच्याशी संपर्क साधला असता जव्हार, डहाणू व कासा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच तलासरी व पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून ढगाळ वातावरण असल्याने ऊर्जा निर्मिती कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उन्हाळय़ात ही प्रणाली कार्यक्षमतेने सुरू नसल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता याप्रकरणी चौकशी करू असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या