पालघर नगर परिषदेसाठी आणि अग्निशमन दलासाठी मनुष्यबळ पुरवठा व कचरा व्यवस्थापनाच्या कामांकरीता सुमारे सव्वानऊ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबवताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसताना मर्जीतील ठेकेदारांना निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी नगर परिषदेने ई-निविदाधारकाला बेकायदा बाद ठरविल्याची तक्रार एका निविदाधारकाकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर नगर परिषदेने आवश्यकतेनुसार विविध विभागांसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक सेवा, मजूर सेवा, आरोग्य निरीक्षक सेवा, वाहन चालक सेवा व इतर आवश्यक सेवांसाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी एक कोटी ८५ लाख रुपयांची निविदा १६ जूनपर्यंत भरण्यासाठी खुली होती. या प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. या निविदेत प्राप्त अर्जाची छाननी २१ जून रोजी करण्यात आली. मात्र ई-निविदा उघडताना निविदाधारक किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांना बोलावले नाही. तसेच या निविदेमध्ये सर्व ठेकेदारांनी नमूद कागदपत्रे सादर केली असताना गठित समितीने नगराध्यक्ष तसेच नगर परिषद कौन्सिलची दिशाभूल केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या निविदा २५ जुलै रोजी स्थायी समितीसमोर तर २९ जुलै रोजी सभेत ठेवल्या असता दोन ठेकेदारांनी आवश्यक कागदपत्रे भरले नसल्याचे कारण पुढे करून त्यांना बाद ठरवण्यात आले व मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याचा बेकायदा प्रयत्न केल्याचे तक्रारीत उल्लेख आहे.

नगर परिषदेने दोन ठेकेदारांचे अर्ज बाद ठरवताना त्यांनी कामगार आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र, व्यवसाय कर प्रमाणपत्र, कामगारांची यादी तसेच अनुभव दाखला निविदे सोबत जोडला नसल्याचे कारण पुढे ठेवले आहे. मात्र याबाबत संबंधित ठेकेदारांनी पूर्ण कागदपत्रे सादर करूनही निविदा का फेटाळण्यात आली याबाबत नगर परिषदेकडे विचारणा केलेली आहे. या निविदेबरोबर सर्व संबंधित कागदपत्र जोडण्याचा पुरावा सादर केला आहे. विशेष म्हणजे ही निविदा नगर परिषदेच्या संकेतस्थळावरून गायब झालेली असून त्याविषयी तपशील नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दडवले असे आरोप करण्यात येत आहेत.

अपूर्ण कागदपत्रांवर कचरा ठेका
पालघर नगर परिषद हद्दीतील पश्चिमेकडे निर्मित होणारा घरगुती कचरा उचलून त्याचे वर्गीकरण करणे, कंपोस्ट खत तयार करणे याकरिता चार कोटी ९२ लाख रुपये तर पूर्वेकडील घनकचरा उचलण्यासाठी एक कोटी ९४ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे या निविदेत थकबाकीदार नसल्याची अट वगळण्यात आली होती. या निविदे प्रक्रियेत तीन निविदाधारकांनी सर्व कागदपत्रांसही अर्ज सादर केले होते तर उर्वरित चार ठेकेदारांची निविदा भरताना कागदपत्र अपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. असे असताना नगर परिषदेने मर्जीतील ठेकेदारांना ठेका देण्याच्या दृष्टीने सर्व सात निविदाधारकांना पात्र ठरवून अनियमितता केली असल्याची तक्रार नगर परिषदेकडे दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या निविदा प्रक्रियेत प्रथम न्यूनतम देयक सादर करणाऱ्या एल-१ निविदाधारकाने अतिरिक्त सुरक्षा अनामत ठेव निविदा मंजूर झाल्यापासून आठ दिवसांत जमा करावा असा नियम असताना या नियमाला बेकायदा शिथिल करण्यात आल्याची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.

अग्निशामक ठेका वादग्रस्त
पालघर नगर परिषदेतर्फे अग्निशमन सेवेत अग्निशमन वाहन चालक, फायरमन सेवा देण्यासाठी ४६ लाख वीस हजार रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. हा ठेका मिळवणाऱ्या ठेकेदारांवर यापूर्वी भविष्य निर्वाह निधी व कामगार विमा योजनेतील रक्कम थकीत आणि लेखापरीक्षण अहवालात आक्षेप असताना त्यांचे निविदा अर्ज ग्राह्य धरण्यात आले. भविष्य निर्वाह निधी विभागाचे थकबाकीदार असल्याने नगर परिषदेच्या बँक खात्यातून परस्पर सक्तीने वसुली केली आहे. नगर परिषदेने ठेकेदाराकडून वसुलीकरिता नोटीस बजावली असली तरी काही नगरसेवकांनी २९ जुलै रोजीच्या मासिक सभेत मेहरबान होऊन अपात्र ठरणाऱ्या ठेकेदारांच्या बाबतीत अट शिथिल केल्याने पालघर नगर परिषद वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नगर परिषदेच्या निविदा प्रक्रियेबाबत तक्रार दखल झाल्यास या बाबत चौकशी करून आवश्यक असलेली करवाई करण्यात येईल. – वैभव आवारे, मुख्याधिकारी, पालघर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crores worth of contracts to favored contractors amy
First published on: 10-08-2022 at 00:04 IST