बोईसर : दाभोसा काचेचा पूल १५ ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी खुला होताच धबधब्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. दोन दिवसात जवळपास १६७५ पर्यटकांनी काचेच्या पुलावर उभे राहून धबधबा बघण्याचा आनंद लुटला. जव्हारच्या प्रसिद्ध दाभोसा धबधब्याजवळील काचेच्या पुलाचे बांधकाम जून महिन्यात पूर्ण करण्यात आले. मात्र उंचावरील पुलाची सुरक्षात्मक तपासणी, खाजगी संस्थेकडे हस्तांतरण, गर्दीचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था इत्यादी बाबी अपूर्ण असल्याने उद्घाटन रखडले होते.
ऐन पावसाळी हंगामात उद्घाटना अभावी काचेच्या पुलावर प्रवेश बंदी असल्याने पर्यटकांचा हीरमोड होत होता. प्रशासनामार्फत सर्व अपूर्ण बाबींची पूर्तता केल्यानंतर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काचेच्या पुलाचे उद्घाटन पार पडले. उद्घाटनानंतर काचेच्या पुलावरील थरारक अनुभव आणि धबधब्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाल्याचे दृश्य दिसून आले. रविवार आणि सोमवारी दोन दिवसात जवळपास १६७५ पर्यटकांनी काचेच्या पुलावर हजेरी लावली.
पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य :
काचेच्या पुलावर प्रवेशासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वाजेपासून संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत पुलावर प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी फक्त सात ते दहा पर्यटकांना पुलावर प्रवेश देण्यात येत आहे. सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पुलावर प्रवेश करण्यास बंदी आहे. दाभोसा काचेच्या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. स्कायवॉकची क्षमता, प्रवेशव्यवस्था, सीसीटीव्ही आणि गर्दी नियंत्रण यंत्रणेची काटेकोर अंमलबजावणी, सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलीस यंत्रणेशी जोडण्यासह प्रवेशद्वारावरील नियंत्रण अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
दाभोसा ग्लास स्कायवॉकमुळे जव्हारच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल, स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊन स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. ॲड. पारस सहाणे अध्यक्ष – जव्हार पर्यटन व वन संवर्धन संस्था
