डहाणू : भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अरबी समुद्रात एक मोठी धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी उधळून लावली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने एका संयुक्त मोहिमेदरम्यान श्रीलंकेजवळ आणि लक्षद्वीपच्या परिघातून एका संशयास्पद इराणी नौकेला ताब्यात घेतले. २५ सप्टेंबर रोजी समुद्रात थरारक पाठलाग करून पकडण्यात आलेल्या या नौकेची झडती घेतली असता, त्यातून ५२६ किलो वजनाचा हेरॉईन आणि मेथाम्फेटामिन या घातक अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान नौकेवर स्वार असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अमली पदार्थांच्या या मोठ्या साठ्याचा वापर देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केला जाणार असल्याचा बलवत्तर संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला तटरक्षक दलाने ही नौका मुंबईला नेऊन तेथे विविध केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत सखोल चौकशी सुरू केली होती. तपासाची व्याप्ती लक्षात घेता, संपूर्ण प्रकरणाचा धागादोरा शोधण्यासाठी या चौकशीला आता अधिक वेग देण्यात आला आहे.
मुंबईतील प्राथमिक चौकशी आणि चौकशीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रकरणाच्या पुढील तांत्रिक आणि सखोल तपासासाठी शुक्रवारी पहाटे ही जप्त केलेली नौका पालघरच्या सीमेलगत गुजरात मधील नारगोलच्या समुद्रकिनारी आणण्यात आली आहे. स्थानिक किनाऱ्यावर नौका आणून आता पुराव्यांची अधिक बारकाईने तपासणी केली जात आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या या सतर्कतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थांचे रॅकेट आणि देशविरोधी कारवायांचा एक मोठा कट वेळीच उघडकीस आला असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
