डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या जागेत प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेमुळे राज्यातील कृषी उत्पन्नाला चांगली बाजारपेठ मिळणार असून स्थानिकांसह पालघर लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाय रोवण्याचा नवी संधी उपलब्ध होणार आहे. शिवाय या प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार असल्याची खात्री पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या जागेची राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवार १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्याची व नकाशाची सविस्तर तपासणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या नियोजनाची माहिती घेतली आणि पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना दिली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दापचरी येथील दुग्ध विकास प्रकल्पाची ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडून होती. या जागेचा योग्य वापर करून येथे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा भव्य प्रकल्प फ्रान्समधील प्रसिद्ध ‘रुंगीस मार्केट’, नेदरलँड्समधील ‘रॉयल फ्लोरा हॉलंड’ तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील अत्यंत आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय मॉडेल्सच्या आधारे उभारल्या जाणाऱ्या या बाजारपेठेमुळे राज्यातील आणि प्रामुख्याने कोकण पट्टीतील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असून शेतमाल निर्यातीला अभूतपूर्व चालना मिळणार आहे.

पाहणी दौऱ्यादरम्यान पणन मंत्र्यांनी बाजारपेठेसाठी पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत परिसरातील कुर्झे धरणाला भेट दिली आणि पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. या बाजारपेठेमुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढीस लागून स्थानिक आदिवासी बांधवांसह परिसरातील हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच या संपूर्ण प्रकल्पामुळे १० हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असून यामध्ये स्थानिक भूमीपुत्रांच्या हिताला आणि रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी सकारात्मक ग्वाही देत मंत्र्यांनी स्थानिकांना भक्कम आश्वासक आधार दिला आहे.

या प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणाहून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, रेल्वे फ्रेट कॉरिडोअर आणि बुलेट ट्रेन मार्ग जात आहेत, तसेच वाढवण बंदर अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. या उत्तम दळणवळण आणि लॉजिस्टिक सुविधांमुळे ही जागा आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासाठी अत्यंत धोरणात्मक व महत्त्वाची ठरणार आहे. या बाजारपेठेमुळे राज्यभरातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सह देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमालाला बाजारपेठ मिळेल. पालघर जिल्ह्यातील स्थानिकांना कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भविष्यात शासनाकडून सर्व आवश्यक सहकार्य आणि मदत पुरवली जाईल अशी खात्री मंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालघर निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे, निवासी जिल्हाधिकारी बाबासाहेब थोरात, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश सावंत, डहाणू तहसीलदार सुनील कोळी, उपनिबंधक किसन रत्नाळे, झेनमार्क सर्वे प्रायव्हेट लिमिटेड चे रुपेश राणे व संतोष चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेत फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस आदी कृषी उत्पादनांसाठी प्रक्रिया, पॅकिंग, साठवण, निर्यात सुविधा आणि शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये मोठ्या क्षमतेची अत्याधुनिक शीतगृहे, वातानुकूलित गोदामे, आधुनिक ग्रेडिंग आणि सॉर्टिंग युनिट्स, तसेच निर्यातक्षम पॅकेजिंग सुविधा एकाच छताखाली उपलब्ध केल्या जातील. शेतमालाच्या गुणवत्तेची त्वरित तपासणी करण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, थेट निर्यातीसाठी आवश्यक असणारे कस्टम्स आणि क्लिअरन्स सेंटर्स, लिलाव केंद्र आणि ई-व्यापार सुविधा उभारल्या जाणार आहेत. याशिवाय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारती, व्यापारी संकुल, बँक सुविधा, ट्रान्सपोर्ट हब आणि कंटेनर यार्ड यांसारख्या पायाभूत सुविधांचाही यात समावेश असणार आहे.

दापचरी दुग्ध प्रकल्प आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मंत्री रावल यांच्यासमोर आपल्या विविध समस्या मांडल्या. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी विविध प्रकल्पांच्या घोषणा होऊन देखील काही एक प्रकल्प राबवण्यात आला नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. या सर्व समस्या ऐकून घेत मंत्री रावल यांनी स्थानिकांच्या समस्यांवर योग्य रित्या तोडगा काढण्याचे आश्वासित केले. तसेच कृषी बाजारपेठेसाठी प्रकल्पाची जागा उपयुक्त असून याठिकाणी प्रकल्प झाल्यास त्याला चांगली चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासीत केले. यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून या नवीन प्रकल्पामुळे स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.