dahanu festival 2022 tourists ignore to visit dahanu beach due to lack of necessary facilities zws 70 | Loksatta

डहाणू पर्यटन विकासाची रखडपट्टी ; ४४ लाखांच्या महोत्सवाचा केवळ गाजावाजा; उद्दिष्टपूर्ती नाहीच 

डहाणू किनारपट्टीला असणारी जागा विकास आराखडय़ात ‘सी व्ह्यू पार्क’करिता आरक्षित असून ती नगर परिषदेकडे वर्ग झालेली नाही

डहाणू पर्यटन विकासाची रखडपट्टी ; ४४ लाखांच्या महोत्सवाचा केवळ गाजावाजा; उद्दिष्टपूर्ती नाहीच 
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

पालघर/ डहाणू : डहाणू तालुक्यात पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी डहाणू नगर परिषदेने आठ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत महोत्सवाचे आयोजन केले होते. परंतु आठ महिन्यांनंतर विकासाच्या दृष्टीने कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे हा महोत्सव केवळ देखावाच राहिला, अशी टीका निसर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून सुरू झाली आहे. महोत्सवावरील ४४ लाख रुपये वाया गेल्याचे म्हटले जात आहे.

जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबई, नाशिकसह गुजरात राज्यातून पर्यटक किनाऱ्यावर येत असतात. मात्र समुद्रकिनारी आवश्यक सोयी-सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांनी डहाणू समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. मार्चच्या मध्यावर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नगर परिषदेने सुमारे ४४ लाख रुपये  खर्च केले होते. मात्र आठ महिन्यानंतरही विकासाच्या दृष्टीने कोणतेही पाऊल पडलेले दिसत नाही.

डहाणू किनारपट्टीला असणारी जागा विकास आराखडय़ात ‘सी व्ह्यू पार्क’करिता आरक्षित असून ती नगर परिषदेकडे वर्ग झालेली नाही. त्यामुळे     मुबलक निधी असतानादेखील जागा नावावर नसल्यामुळे नगर परिषेदला सुविधा देता येत नसल्याचे मुख्यधिकारी वैभव आवारे यांचे म्हणणे आहे. लहान व मध्यम स्वरूपाच्या न्याहारी निवास  केंद्रांची संख्या वाढल्यास पर्यटकांचा ओघ  डहाणू येथे वाढून त्यावर आधारित व्यवसायाला चालना मिळू शकेल. शासनाने  परवानग्यांसाठी एक खिडकी योजना अमलात आणावी अशी मागणी पुढे येत आहे.

सुविधांची प्रतीक्षा

*  समुद्रकिनाऱ्यावर असलेले प्रसाधनगृह बंद.

* समुद्रात फेरफटका मारण्यासाठी पर्यटक बोटी नाहीत.

* लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य, बसण्यासाठी बाके, स्नानगृह, चेंजिंग रूमचा अभाव

* पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी सुरक्षारक्षक व टेहळणी मनोरेची असुविधा

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 05:09 IST
Next Story
डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार