डहाणू : मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाचे डहाणू तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. द्रुतगती मार्गाच्या या विकासकामामुळे गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गासाठी प्रस्तावित असलेल्या सेवा रस्त्यामुळे आरोग्य केंद्राकडे जाणारा एकमेव मार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भविष्यात रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी सध्या जो एकमेव मार्ग वापरला जातो, त्याच मार्गावरून द्रुतगती मार्गाचा सेवा रस्ता जाणार आहे. तांत्रिक रचनेनुसार या सेवा रस्त्याची उंची सध्याच्या जमिनीच्या स्तरापेक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच या रस्त्यावरून भविष्यात वाहनांची मोठी वर्दळ असणार आहे. कामाच्या आराखड्यानुसार, सेवा रस्ता पूर्ण झाल्यानंतर महामार्गाच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या संरक्षक भिंतीमुळे आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडवला जाणार असून, केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता उरणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या परिसरात आरोग्य केंद्रासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याकरिता कोणतीही अतिरिक्त जागा शिल्लक नाही. सद्यस्थितीत महामार्गाचे काम सुरू असल्याने ठेकेदार कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपलब्ध करून दिला आहे, परंतु हा केवळ कामापुरता मर्यादित उपाय आहे. सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर निर्माण होणारी भौगोलिक परिस्थिती पाहता, रुग्णवाहिका किंवा रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होणार आहे.
गंजाड आणि परिसरातील आदिवासी पाड्यांमधील नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. महामार्गाच्या विकासामुळे स्थानिक दळणवळण सुलभ होणार असले, तरी सार्वजनिक आरोग्य सेवेचा मार्गच बंद होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सेवा रस्ता आणि संरक्षक भिंत उभारण्यापूर्वी प्रशासनाने आणि संबंधित विभागाने यावर गांभीर्याने विचार करून तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा, हक्काचे आरोग्य केंद्र असूनही रस्ता नसल्यामुळे रुग्णांचे हाल होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील गावे अवलंबून आहेत. द्रुतगती मार्गाच्या कामात आरोग्य केंद्राच्या इमारतीचा काही भाग बाधित होत असल्याने तसेच इमारत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद कडून याठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आली होती. आरोग्य केंद्राची इमारत आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने इथे पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. याठिकाणी सुसज्ज इमारत उभारणीनंतर २०२५ मध्ये इमारतीचे लोकार्पण करून कामकाज सुरू करण्यात आले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारा रस्ता द्रुतगती सेवा रस्त्यामुळे बंद होणार असल्याचे दिसत आहे. याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले जात आहे. मात्र याविषयी अद्याप ठोस उपाययोजना सुचवण्यात आलेल्या नाहीत. याठिकाणी दुसरा कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने रस्ता बंद होण्याची भीती आहे. तसेच द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यावरून वाहनाची मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता असल्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. – अभिजित देसक, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत गंजाड.
आरोग्य केंद्रात जाणारा मार्ग द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्याने बाधित होत आहे. याठिकाणी सुरक्षारक्षक भिंत बांधली जाणार असून आरोग्य केंद्रात जाण्यासाठी जागा सोडण्यात येणार आहे. याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनी सोबत चर्चा झाली आहे. सध्या हे काम सुरू असून आरोग्य केंद्रासाठी रस्त्याचे योग्य नियोजन करण्यात येईल. – संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर.
