डहाणू : पर्यावरणदृष्टय़ा अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुका प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. तालुक्यातील हवेची गुणवत्ता धोकादायक स्थितीत असून एका येथील संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात वेगवेगळय़ा नमुन्यांमध्ये हे निदर्शनात आले आहे. या नमुन्यामध्ये श्वसनास त्रासदायक असलेले सिलिका, मँगनीज आणि निकेल यासारखे जड धातू घटक आढळून आल्याचे संस्थेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 तालुक्यात विशेष मालवाहू रेल्वे मार्गिका  (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी), मुंबई -बडोदा सुपर एक्सप्रेस वे यासह अनेक प्रकल्प सुरू आहेत. तसेच थर्मल पॉवर स्टेशन,  औद्योगिक उपक्रम यामुळे  फलोत्पादन आणि मासेमारीची उत्पादकता कमालीची घटली आहे. २००२ पासून, चिकूचा दर्जा कमी झाल्याने आमच्या फळांचे बाजारमूल्यही घसरले आहे. चिकूचे फळ काळे होणे आणि संपूर्ण डहाणूवर परिणाम करणारे पिकांचे अकाली नुकसान ह्यांचा शेतकऱ्यांवर होणारा हा व्यापक परिणाम दिसू लागल्याने तसेच फळ आणि फुलांच्या उत्पादकतेत घट होऊ लागल्याने चिकू उत्पादकांच्या एका गटाने डहाणू तालुका एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशनशी संपर्क साधून समस्या मांडल्या. त्यानंतर पर्यावरण प्रदूषण आणि शेती यांच्यातील परस्परसंबंध शोधण्यासाठी डहाणू तालुका एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशनकडून  हेल्दी एनर्जी इनिशिएटिव्ह – इंडियाद्वारे वायू घटकांच्या तपासणीचा  अभ्यास करण्यात आला. या वेळी  डहाणूच्या वेगवेगळय़ा १२ ठिकाणाहून घेतलेल्या नमून्यामध्ये सर्व ठिकाणी  PM2.5 ची ‘धोकादायक आणि रोग पसरवू शकणारी’ पातळी नोंदवली गेली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे.  दरम्यान, याबाबत २३ जून रोजी डहाणू तालुका एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशनची बैठक होणार असून त्यामध्ये  या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकास दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे असोसिएशनच्या फिरोजा तफ्ती यांनी  सांगितले.

निरीक्षण काय?

डहाणू येथे केलेल्या वायुप्रदूषण निरीक्षणात भारतीय  (NAAQS)  आणि आंतरराष्ट्रीय मानके  (वर US EPA)  या दोन्हींच्या तुलनेत सॅम्पिलग साइटवर कणिक पदार्थाची पातळी (PM2.5) अत्यंत उच्च असल्याचे आढळून आले. जर प्रदूषण अव्याहतपणे चालू राहिले तर हे, सिलिका धूलिकणाच्या घातक पातळीच्या संयोगाने, या भागातील नागरिकांच्या श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम करेल, असे डॉ. आदित्य प्रद्युम्न, सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ आणि अझीम प्रेमजी विद्यापीठाचे प्राध्यापक सदस्य म्हणाले.

फळ-भाज्यांवर परिणाम

  • किनारी खाडय़ा, खारफुटी, टेकडय़ा, जंगले, नद्या, नाले आणि तलाव यासारख्या  पर्यावरणीय वैशिष्टय़ांमुळे डहाणू या प्रदेशाचा  फूड बाउलह्ण मानला जातो कारण येथे अनेक टन चिकू (मणीलकारा झापोटा), पेरू, आंबा, नारळ, सीफूड, मिरची आणि शिमला मिरचीसह भाज्या, चारा, स्पायडर लिली आणि मीठ यांचे उत्पादन होते. मात्र वायू प्रदूषणामुळे त्याची उत्पादकता घटली आहे. फलोत्पादन उत्पादकतेच्या नुकसानीची चौकशी आणि आवश्यक नुकसान भरपाई देण्याची मागणी डहाणू तालुका एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशन करणार आहे.
  • डहाणूच्या आसपासच्या उद्योगांची वाढती घनता, डहाणू थर्मल पॉवर प्रकल्प, उत्तर आणि दक्षिणेकडील औद्योगिक क्लस्टर्स, रस्ते आणि विशेष मालवाहू रेल्वे मार्गिकेचे बांधकाम आणि काँक्रीटचे बांधकाम क्षेत्र वाढणे हे वायुप्रदूषणाचे संभाव्य स्रोत म्हणून कारणीभूत ठरू शकतात. त्याविरुद्ध दंडात्मक कारवाई मागणी आम्ही करणार आहोत.  -फिरोजा तफ्ती, डहाणू तालुका एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशन 

डहाणू येथे हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीपुढे असल्यासंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण अदानी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकडून केल्या जाणाऱ्या ऑनलाइन हवेच्या गुणवत्तेचा अहवाल मागवला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्तेत असे निष्कर्ष आढळले नव्हते. कृषी व इतर संबंधित विभागाला हवेची गुणवत्ता तपासून अहवाल पाठवण्यासाठी सूचित करण्यात येत आहे. डहाणू परिसरात वेगवेगळय़ा प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या माती व दगडाचा भरावा करण्याच्या प्रक्रियेत हवेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. सध्या पाऊस सुरू झाल्याने ही समस्या तूर्त उद्भवणार नाही.

– वीरेंद्र सिंग, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanu grip pollution air quality environmentally sensitive dangerous ysh
First published on: 22-06-2022 at 00:02 IST