डहाणू: अन्न आणि औषध प्रशासनाने कोकण गुप्तवार्ता विभागाच्या माहितीवरून शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चारोटी टोल नाक्यावर सापळा रचून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत ४३ लाख ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि २० लाख रुपयांचे वाहन असा एकूण ६३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संघटित गुन्हेगारीचा संशय असल्याने मकोका अंतर्गत कारवाई चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने आयशर टेम्पो मधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी अन्न व औषध प्रशासनच्या कोकण विभागाला मिळाली होती. त्याआधारे सहायक आयुक्त प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे, यु. आर. कावळे, तसेच गुप्तवार्ता विभागाचे माणिक जाधव आणि बडे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास चारोटी टोल नाक्यावर नाकाबंदी केली. संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात ‘बाजिराव सुगंधित पानमसाला’ (किंमत ३७ लाख ५० हजार रुपये) आणि ‘मस्तानी २१६ प्रिमियम च्युविंग टोबको’ (किंमत ६ लाख रुपये) चा मोठा साठा मिळून आला.

या कारवाईत टेम्पो चालक फिरोज खाजा मिया सय्यद (वय ३४, रा. बिदर, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचा माल मालक जावेद भाई, खामगाव येथील पुरवठादार निलेश राठी, मुंबईचा बिलाल सेठ, वाहन मालक सय्यद अबुबकर सय्यद अफजल, वाहन सोपवणारा अज्ञात इसम आणि माल स्वीकारणारा उमरगा येथील अमीर भाई यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रात जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही हा साठा चोरट्या मार्गाने आणला जात होता.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे यांच्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक फायद्यासाठी चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १२ जून २०२६ च्या आदेशानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. कासा पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.