महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक अन्न व औषध प्रशासन आणि ठाणे दक्षता पथकाने उघडकीस आणली आहे. सोमवार २८ सप्टेंबर रोजी चारोटी टोलनाका येथे केलेल्या कारवाईत ५० लाख ५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला माल आणि वाहन मिळून एकूण ७० लाख ५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी संशयित वाहनाचा मागोवा घेतला. वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याचा पाठलाग केला आणि डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाका येथे वाहन थांबवून तपासणी केली. झडतीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि पानमसाला आढळून आला.

प्राथमिक तपासणीनंतर सर्व माल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून अशा अवैध वाहतुकीवर आणि साठवणुकीवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची तपासणी व कारवाई सातत्याने सुरू आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. श्री. प्रविण सूर्यवंशी, सहायक आयुक्त (अन्न), पालघर