डहाणू ; डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या एका कारचा पोलिसांकडून पाठलाग सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात चार जण जखमी झाले आहेत. सोमवार ३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास कासा येथील कुरेशी दरबार भागात हा अपघात घडला असून जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

चारोटी बाजूकडून जव्हारच्या दिशेने अवैध मद्य घेऊन जाणाऱ्या एका कारचा वाहतूक पोलिसाने पाठलाग सुरू केला होता. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने कारचालकाने वाहनाचा वेग वाढवला. मात्र, कासा हद्दीतील खड्डेमय रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच दुचाकींना व तेथे उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या अपघातात संदेश तुकाराम कवले आणि मयुर सुरेश कांबेरा यांच्यासह इतर दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर कारचा चालक बिलाल हा घटनास्थळावरून पसार झाला असून कारमधील अक्षय मोहन शिरसाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेनंतर वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये अवैध मद्य आढळून आले असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यात गर्दी करून या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. खड्डेमय आणि रहदारीच्या रस्त्यावर वाहनाचा असा पाठलाग केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.

दरम्यान, या प्रकरणी अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांवर आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसावर नेमकी काय कारवाई होणार याविषयी पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसेच, पोलिसांकडून झालेला हा पाठलाग वरिष्ठांच्या सूचनेनुसार होता की नाही याबाबत पोलिसांकडून स्पष्टीकरण येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सध्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पसार झालेल्या चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.