डहाणू : डहाणूत गेल्या अडीच महिन्यांपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र खोल समुद्रात जाऊनही हवे त्याप्रमाणे मासे मिळत नाहीत. आठ आठ दिवस समुद्रात राहून येणाऱ्या बोटींनासुद्धा अपेक्षित प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

घोळ, दाढा, पापलेट, सुरमईसाठी प्रसिद्ध असलेल्या डहाणू बंदरातील माशांच्या प्रजाती नष्ट होताना दिसत आहेत. ज्या काही प्रजाती शिल्लक आहेत त्यांनाही वाढीसाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याने समुद्रातील मासे मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे मत स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत. यापूर्वी जुलै-ऑगस्ट महिन्यातील मासेमारील बोंबील, पापलेट मिळत असत. परंतु गेले अडीच महिने एकाही बोट मालकाला पापलेटचे दर्शन न झाल्याने अचंबा व्यक्त केला जात आहे. एक जूनपासून पारंपरिक मासेमारी सुरू होऊनही आतापर्यंत एकाही मच्छीमाराच्या जाळय़ात पुरेशी मासळी येत नसल्याने स्थानिक मच्छीमार पुरता हवालदिल झाला आहे. डहाणू बंदराअंतर्गत येणाऱ्या चिंचणी, वरे, वाढवन, गुंगवाडा, तडियाले, डहाणू खाडी, नरपड, आगर, चिखला, बोर्डी, झाई येथील किनारपट्टीवरील गावांत मासेमारीसाठी आठ-आठ दिवस गेलेल्या बोटी रिक्तहस्ते परतू लागल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.

स्थानिक मच्छीमारांची कोंडी

समुद्रातील प्रदूषण वाढीस लागत आहे. तेलसाठे शोधण्यासाठी समुद्रात मागील काही वर्षांपासून भूगर्भ सर्वेक्षण सुरूच आहे. शिवाय अवैध मासेमारीवर शासनाचा अंकुश नाही. गेल्या अनेक वर्षांपासून एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असूनही अशा प्रकारची मासेमारी सर्रास केली जाते. त्यामुळे मत्स्य जीवांवर विपरीत परिणाम होऊन, मत्स्यसाठा कमी होतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने स्थानिक मासेमारी करणाऱ्या छोटय़ा मच्छीमारांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे.

बोटीसाठी हजारो रुपयांचे इंधन लागते. परंतु बोट समुद्रात गेल्यावर मात्र मासे हाताशी लागत नाहीत. त्यामुळे मच्छीमार निराश होत आहेत.

अशोक अंभिरे, अध्यक्ष गुंगवाडा मच्छीमार सोसायटी, डहाणू खाडी