डहाणू: प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भाडेतत्त्वावर लावलेल्या गाड्यांचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. डॉ. विजय माणिक सांगळे ( ४१, वर्ग-२) असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड अंतर्गत आंबेसरी येथे भरारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार आणि त्यांच्या दोन मित्रांच्या ‘इको’ गाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड अंतर्गत नागझरी, जामशेत आणि आंबेसरी उपकेंद्रात भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. मार्च २०२५ ते ऑगस्ट २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीचे गाड्यांचे भाड्याचे बिल मंजूर झाले होते. हे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून डॉ. सांगळे यांनी दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे तिन्ही गाड्यांचे मिळून लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती प्रत्येक चालकाकडून ३० हजार रुपये आणि डिपॉझिटचे ५ हजार रुपये, असे मिळून एका चालकाकडून ३५ हजार आणि तिघांचे मिळून एकूण १,०५,००० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आज १७ मार्च रोजी दुपारी आशागड चौकाकडून जामशेतकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला. डॉ. सांगळे यांनी तक्रारदाराकडून पहिल्या हप्त्यापोटी ३५,००० रुपये स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना निळसर टपरीशेजारी पंचासमक्ष रंगेहात ताब्यात घेतले.
याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस हवालदार नवनाथ भगत, विलास भोये, योगेश धारणे, आकाश लोहारे, प्रकाश दळवी, जितेंद्र गवळे आणि गीता कहार यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक राकेश डांगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
