डहाणू: येत्या १ ऑगस्ट रोजी पालघर जिल्हा निर्मितीला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना डहाणू तालुक्यातील रायतळी-चांदवड येथील डोंगरीपाड्यात २३ जुलै रोजी घडलेल्या एका घटनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील मूलभूत सुविधांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा उघड झाली आहे. अपूर्ण रस्त्यामुळे एका गंभीर जखमी तरुणाला १ किलोमीटर अंतर डोलीतून वाहून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या घटनेमुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा आणि दळणवळणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

गुरुवार २३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास स्थानिक रहिवासी करण देसक हा झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. घटनेनंतर करण काही काळ बेशुद्ध झाला होता. चांदवड येथील डोंगरीपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण झाले असले तरी रस्त्यावरील मोरीचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे रुग्णवाहिका थेट पाड्यापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर ग्रामस्थांनी जखमी करण यांना डोलीत बसवून १ किलोमीटर अंतर पार करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना डहाणू कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्याला पुन्हा तपासणी साठी न्यावे लागणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

यापूर्वी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी बहुल भागांतही रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्याने रुग्णांना डोली किंवा झोळीतून वाहून न्यावे लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २३ जुलैच्या या घटनेने जिल्ह्यातील या जुन्या आणि गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या मोरीचे काम पूर्ण करण्याची मागणी रायतळी-चांदवड येथील ग्रामस्थ करत आहेत. यापूर्वीही दोन रुग्णांना अशाच प्रकारे डोलीतून न्यावे लागले होते. तसेच चार वर्षांपूर्वी वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीला १० पेक्षा जास्त वेळा लेखी निवेदने देण्यात आली आहेत तरीही काम पूर्ण झालेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या मोरीअभावी रुग्ण, वृद्ध, विद्यार्थी आणि गरोदर महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यामुळे याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

यापूर्वी देखील अश्याच एका घटनेत एकाच मृत्यू झाला होता. आता घडलेल्या घटनेत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मागील तीन वर्षांपासून आम्ही मोरी बांधण्याची मागणी करत आहोत. मोरी झाली तर रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवता येईल. शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घ्यावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ उपोषणाला बसू. दिनेश शिंगाडा, ग्रामस्थ, रायतळी-चांदवड डोंगरीपाडा

कागदोपत्री ‘आदर्श गाव’, प्रत्यक्षात मात्र समस्या कायम

एका बाजूला डोंगरीपाड्यात मोरीअभावी रुग्णाला डोलीतून न्यावे लागत असताना, दुसरीकडे हे गाव कागदोपत्री ‘आदर्श गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या २८ मार्च २०२५ च्या निर्णयानुसार गंजाड-रायतळी-घोलवड या परिसराचा ‘आदर्श आदिवासी गाव’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. १२ मे २०२६ रोजी राज्यपाल कार्यालयातील सहसचिव रामा स्वामी यांनी या भागाचा दौरा करून विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू कार्यालयाकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून राज्यपाल कार्यालयाला सादर करण्यासाठी माहिती मागवण्यात आली आहे. कागदावर गावाचा समावेश आदर्श गाव योजनेत झालेला असला तरी प्रत्यक्ष पाड्यात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.