डहाणू: प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून मंगळवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डहाणूतील पारनाका येथील सुरूच्या बागेत ६० फूट उंच झाडावर चढलेल्या तलासरीतील एका अल्पवयीन तरुणाचे प्राण वाचवण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तासभर फोनवरून केलेल्या कौशल्यापूर्ण मनधरणीमुळे तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले आहे.

प्रेमप्रकरणातील नैराश्यामुळे हताश झालेला हा अल्पवयीन तरुण दुपारी साडेबाराच्या सुमारास पारनाका पर्यटनस्थळाजवळील सुरूच्या बागेत पोहोचला आणि तेथील एका ६० फूट उंच झाडावर चढला. झाडावर चढल्यानंतर स्वतः या तरुणाने पालघर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. कंट्रोल रूमकडून संदेश मिळताच दुपारी पावणेएकच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शेलार आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डहाणू नगरपरिषदेचे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका देखील खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोहोचली.

झाडाची उंची जास्त असल्याने तरुणाला खाली उतरवणे मोठे आव्हान होते. अशा वेळी पोलीस अधिकारी अंकुर शेलार यांनी प्रसंगावधान राखत तरुणाशी फोनवरून संपर्क साधला. सुमारे तासभर त्यांनी अतिशय आपुलकीने आणि संयमाने संवाद साधत त्याची समजूत काढली. शेलार यांच्या या संवादाचा सकारात्मक परिणाम होऊन तरुणाने टोकाचा निर्णय मागे घेतला आणि दुपारी पावणेदोनच्या सुमारास तो सुरक्षितपणे खाली उतरला. तरुण सुखरूप खाली येताच उपस्थित नागरिक आणि पोलीस पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून त्याला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले असून डहाणू पोलीस व आपत्कालीन यंत्रणेने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.