डहाणू : डहाणू तालुक्यातील अडवली नजिकच्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक निसर्ग शाळा, शंकरपाडा या दुर्गम भागातील शाळेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस-२’ या चंद्रमोहिमेत या शाळेतील २७४ विद्यार्थी आणि ११ शिक्षकांची नावे चंद्रावर जाणार आहेत. या सर्वांना नासाकडून अधिकृत ‘डिजिटल बोर्डिंग पास’ प्राप्त झाले आहेत. २०१९-२० च्या ‘मंगळ’ मोहिमेनंतर शाळेने पुन्हा एकदा अवकाश विश्वात ही मोठी झेप घेतली आहे. नासाच्या ‘सेंड युवर नेम टू द मून’ (चंद्रावर तुमचे नाव पाठवा) या जागतिक उपक्रमांतर्गत जगभरातील लोकांची नावे डिजिटल स्वरूपात अंतराळात पाठवली जातात.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय हणमंतराव वाघमारे यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन नासाच्या अधिकृत पोर्टलवर अत्यंत दुर्गम भागातील या शाळेची यशस्वी नोंदणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांची नावे एका विशेष ‘स्मृती कार्ड’ (एस डी कार्ड) मध्ये संग्रहित केली जाणार असून, हे कार्ड ‘ओरियन’ यानाद्वारे चंद्राच्या कक्षेत पाठवले जाईल. एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील कॅनेडी स्पेस सेंटरवरून या मोहिमेचे प्रक्षेपण होणार आहे.

तब्बल ५४ वर्षांनंतर मानवाची चंद्राकडे होणारी ही ऐतिहासिक झेप असून, या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. खान अकॅडमी मार्फत चालवल्या जाणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान समृद्धी कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली आहे, ज्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया:

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला यातून नक्कीच चालना मिळेल. — संजय वाघ, गटशिक्षणाधिकारी, डहाणू

नारळीकर गणित विज्ञान समृद्धी कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली आहे. याचाच परिणाम म्हणून आज शंकरपाडा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची नावे नासाच्या मोहिमेद्वारे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत, ही पालघर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. — सोनाली मातेकर,