डहाणू : डहाणू तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्याने नागरिकांकडून लाच मागितल्याचा प्रकार बुधवार २ सप्टेंबर रोजी समोर आला आहे. रेशन कार्ड काढून देण्यासाठी रेशन कार्ड मागे प्रत्येकी ५०० रुपये लाच मागण्यात आली असून ही लाच स्वीकारताना तहसीलदार कार्यालयातील गोदाम लिपीकाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार देणारी व्यक्ती नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यास मदत करतात. दरम्यान ते आठ व्यक्तींचे रेशनकार्ड काढण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांची तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा गोदाम लिपीक सचिन व्हरगर यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर सचिन यांनी या तक्रारदाराकडे आठ रेशनकार्ड बनवून देण्यासाठी प्रति कार्ड ५०० रुपये प्रमाणे एकूण ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर २०२६ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत सचिन व्हरगर याने तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सापळा रचून पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ६ रेशनकार्ड काढून देण्यासाठी ३ हजार रुपये लाच स्वीकारताना आरोपी सचिन व्हरगर याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरचे पोलीस निरीक्षक राकेश डांगे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. तसेच कोणताही शासकीय लोकसेवक कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा पालघर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
