पालघर : डहाणू रोड ते विरार दरम्यानच्या पट्ट्यात विलंबाने धावणाऱ्या लोकल व मेमु च्या बाबतीत आढावा घेऊन योग्य त्या सूचना करणार असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांना आश्वासित केले आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी , काही उपनगरीय सेवांच्या वेळेत बदल करणे, लांब पल्य्यांच्या गाडयांना नव्याने थांबे देणे आदींचा समावेश होता.

पालघर चे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि रेल्वे सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदने दिली आहेत. या भागातील नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी मागण्या केल्या असून रेल्वे मंत्री यांनी सकारात्मकता दाखविल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल गाड्यांचा उशीर व साइडिंग (Siding) थांबवणे:

डहाणू-विरार मार्गावरील लोकल आणि मेमू गाड्यांना मेल/ एक्सप्रेस गाड्यांना पास देण्यासाठी २०-३० मिनिटे साइडिंगला (बाजूला) उभे केले जाते. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. विशेषतः पीक अवरमध्ये (गर्दीच्या वेळी) लोकल गाड्यांना प्राधान्य देऊन त्यांचा वक्तशीरपणा सुधारावा, अशी आग्रही मागणी डॉ. सवरा यांनी केली आहे.

डहाणू लोकल च्या वेळेत बदल (पहिली लोकल):

डहाणू रोडवरून सुटणारी पहिली लोकल सध्या पहाटे ४:४० वाजता आहे. ती ५:१६ वाजता पालघरला पोहोचते, परंतु क्रॉसिंगमुळे तिला अनेकदा उशीर होतो. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होतो. या समस्येवर तोडगा म्हणून पहिली लोकल पहाटे ४:४० ऐवजी ४:०० वाजता सोडावी, जेणेकरून ती सकाळी ६:१५ पर्यंत चर्चगेटला पोहोचेल, अशी विनंती खासदारांनी केली आहे.

पालघर स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत:

पश्चिम रेल्वेने काही गाड्यांच्या थांब्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता (Feasibility) मान्य केली असून, खासदार डॉ. सवरा यांनी खालील गाड्यांना पालघर स्थानकावर लवकरात लवकर थांबा देण्याची मागणी केली आहे:

  • १२९३५/३६ वांद्रे- सुरत इंटरसिटी एक्सप्रेस
  • २०९४१/४२ वांद्रे- गाजीपूर एक्सप्रेस
  • १२९७१/७२ वांद्रे- भावनगर एक्सप्रेस
  • १२००९/१० मुंबई सेंट्रल- अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस (वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळामुळे वाढणारे महत्त्व लक्षात घेता).

डहाणू रोड स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा:

डहाणू रोड हे एक प्रमुख स्थानक असूनही काही सुपरफास्ट गाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे खालील गाड्यांना डहाणू रोड येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे: गाडी क्र. १२९७१/७२ (वांद्रे-भावनगर सुपरफास्ट एक्सप्रेस): दोन्ही बाजूंनी ये-जा करताना.गाडी क्र. १९०२० (देहरादून एक्सप्रेस): सध्या ही गाडी केवळ देहरादूनकडे जाताना थांबते, ती परतीच्या प्रवासात (वापसी दिशा) सुद्धा डहाणू रोडला थांबवावी.

विशेष गाड्यांचे (Special Trains) नियमितीकरण:

सध्या तात्पुरत्या स्वरूपात चालणाऱ्या विशेष गाड्या (०९०५५/०९०५६ आणि ०९०३५/०९०३६) या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, या गाड्यांचे विलीनीकरण करून त्यांना एकच नियमित दैनिक गाडी (Daily Train) म्हणून चालवावे आणि त्यांना ‘जनरल भाडे’ लागू करावे, जेणेकरून सामान्य प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळेल.