नीरज राऊत

पालघर : बोर्डी गावाच्या आरंभी असणाऱ्या खुटखाडी येथे ग्रामपंचायतीतर्फे उभारण्यात आलेला बंधारा दुरुस्त न झाल्याने परिसरातील ७० पेक्षा अधिक पाणी स्रोतांमधील गोडे पाणी खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात असणाऱ्या सुमारे दीडशे एकर क्षेत्रावरील भात शेती व बागायतीवर परिणाम होण्याची देखील शक्यता असून या भागात अजूनही खारलँड विभागाकडून बंधारा प्रस्तावित नसल्याची माहिती पुढे आली आहे.

खुटखाडीवरील जुन्या पुलावरून पावसाचे पाणी तसेच उधाणाचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक अनेकदा बंद होत असे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षांपूर्वी या खाडीवर नवीन पूल बांधला. या पुलाचे गाळे मोठे केल्याने खाडीतून येणाऱ्या खाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक तेज झाल्याने या पुलाखाली ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात येणारा बंधारा तुटून जात असे. या बंधाऱ्याची यंदाच्या वर्षी ग्रामपंचायतीने दुरुस्ती केली नसल्याने यंदा नव्याने समस्या उद्भवली आहे.

परिणामी यंदाच्या पावसाळय़ात आलेल्या उधाणाचे खारे पाणी खाडीपासून दीड किलोमीटर परिसरात खाडीच्या पात्रात तसेच शेत जमिनीमध्ये शिरले. यामुळे भरवाडपाडा व धुंदियावाडी परिसरातील तीस-चाळीस विहिरी तसेच तितक्याच संख्येने कूपनलिकांमधील गोडेपाणी मचूळ (निमखारे) होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याखेरीज या ठिकाणी असणाऱ्या ५० एकर शेतीसह दीडशे एकर जमिनीवर निमखारे पाणी शिरकाव करण्याची शक्यता असून या ठिकाणी गेट असणारा कायमस्वरूपी बंधारा उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली आहे.

बंधाऱ्याची पार्श्वभूमी

खुटखाडी क्षेत्रातून समुद्राचे पाणी शेती बागायती क्षेत्रात शिरत असल्याने पूर्वी एक स्थानिक इराणी नागरिक स्वखर्चाने हा बंधारा फेब्रुवारी महिन्यात बांधत असे. या खाडीवरील नव्याने पूल उभारल्यानंतर ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी बंधारा उभारला. त्या ठिकाणी समुद्री पाण्याच्या प्रवाहाच्या दाबामुळे तसेच स्थानिक मच्छीमार मासेमारी करण्याच्या उद्देशाने हा कच्चा बंधारा फोडत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीकडे या नियमितपणे फुटणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी नसल्याचे सांगून बंधाऱ्यांची दुरुस्ती न झाल्याने बोर्डी भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बंधारा कोणी बांधायचा?

खाडीवरील बंधारा बांधण्याचे काम पतन विभाग करत असते. मात्र या विभागाचे बंधारे हे समुद्रकिनारी असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर खाडी क्षेत्रात खारलॅण्ड विभागाकडून बंधारा उभारण्यासाठी आपल्याकडे कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे या विभागाच्या पालघरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे व सभोवतालच्या भागातील पाणी स्रोतांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायत या तात्पुरत्या बंधाऱ्याची उभारणी करत असली तरी याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला नोटीस बजावल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नेमका हा बंधारा कोण उभारणार याबाबतचा संभ्रम स्थानिक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.