कासा : मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीत एका गरोदर महिलेने दिलेल्या जुळय़ा बालकांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. तर प्रसूतीनंतर प्रकृती गंभीर झालेल्या महिलेला रस्ता नसल्यामुळे तिला उपचारासाठी डोली करून तीन किमी अंतरावरील आरोग्य केंद्रात नेण्याची वेळ आली.

मर्कटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्यांची गरोदर होती, तिला अचानक शनिवारी प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, कुटुंबीयांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली, तिने १०८ रुग्णवाहिकासुद्धा बोलावली, मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. दरम्यान,  तिची प्रसूती घरातच झाली, तिने जुळय़ा बालकांना जन्मही दिला. परंतु  उपचाराअभावी दोन्ही बालकांचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावत गेली होती. गावात पक्का रस्ता  आणि वाहन उपलब्ध  नसल्यामुळे  आरोग्य केंद्रापर्यंत त्या महिलेला ग्रामस्थांना  झोळी करून डोंगर-दऱ्या कपारीतून थेट तीन किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणावे लागले. तेथून तिला रुग्णवाहिकेमधून खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, २ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गोिवद बोडके यांनी या गावाची पाहणी केली होती, त्यांनी या गावात तातडीने रस्ता मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता हा रस्ता कधी तयार होतो याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आहे.