Decreased air quality Tarapur Pollution control board neglect environmental degradation akp 94 | तारापूरमध्ये हवेच्या दर्जात घसरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास | Loksatta

तारापूरमध्ये हवेच्या दर्जात घसरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास

अलीकडील काळात तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना राष्ट्रीय हरित लवादाने रासायनिक प्रदूषणाबाबत खडसावून दंडही आकारला होता. 

तारापूरमध्ये हवेच्या दर्जात घसरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास

|| निखिल मेस्त्री

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांकडून अद्यापही प्रदूषण सुरूच असून जलप्रदूषणानंतर आता त्यांच्या वायुप्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याला प्रदूषण नियंत्रण मंडळही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप  होत आहे. बुधवारी बोईसर व परिघात १५३ च्या जवळपास निर्देशांक होता जो घातक आहे.

अलीकडील काळात तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना राष्ट्रीय हरित लवादाने रासायनिक प्रदूषणाबाबत खडसावून दंडही आकारला होता.  आता वायुप्रदूषणाचा मुद्दा डोके वर काढू लागला आहे. वायुप्रदूषणाच्या नियमावलीला बगल देऊन काही कारखाने हवेत धोकादायक, विषारी वायू सोडत आहेत. रात्री, पहाटेच्या वेळी हे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत आहेत.  वायुप्रदूषण व हवा गुणवत्ता  मोजणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. विषारी वायू थेट हवेत सोडत असल्याने औद्योगिक वसाहतीसह  पाम, टेम्भी, कोलवडे, सरावली, नवापूर, पास्थळ, सालवड, कुंभवली आदी गावांवर वायुप्रदूषणाचे सावट आहे. गावांमध्ये असलेल्या  झाडांच्या पानांवर वायुप्रदूषणातील विषारी घटकाचा थर साचत आहे.  वृक्षसंपत्ती, बागायत, भातशेती, भाजीपाला या सर्वावरही परिणाम जाणवत आहे.  डोळे जळजळणे, घसा खवखवणे, घसा कोरडा पडणे, फुप्फुस-श्वासोच्छवासाचे आजार बळावत असून  आहे. आरोग्य विभागाच्या अनेक  आरोग्य शिबिरात कर्करोग रुग्णही आढळून आले होते. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांकडून होत आहे.

धोका पोहोचण्याची भीती

तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर व परिघात वायू गुणवत्ता निर्देशांक  बुधवारी १५३ च्या जवळपास होता. गेल्या अनेक महिन्यांपासून वाढ झालेला निर्देशांक  भविष्यात धोका वाढवणारा आहे. एका संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. हवेचा दर्जा खालावल्याने धोका उद्भवू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी, असे वैद्यकीयतज्ज्ञांकडून सांगण्यात आले  आहे.

प्रदूषणाबाबतची गंभीरता प्रदूषण मंडळाला नाही. त्यांच्या व कारखानदारांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव व आरोग्य धोक्यात आहे. वेळीच तोडगा निघाला नाही तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.  -कुंदन संखे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती

हवेचा गुणवत्ता निर्देशांक नागरिकांना ज्ञात होण्यासाठी हवेच्या दिशेने खैरापाडा येथे यंत्रणा बसवण्यात आली आहे. कारखान्यातून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायूला नैसर्गिक वायूमध्ये रूपांतरित करण्यासाठी १०० हून अधिक कारखान्यांना सूचना केल्या आहेत. पर्यावरणपूरक वातावरण राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.   -प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2022 at 00:21 IST
Next Story
करोना अतिरिक्त देयकांचा विषय अधांतरी; ५० लाख रुपयांपैकी फक्त दहा लाख रुपयांचा रुग्णांना परतावा